मजुराच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटी रुपये, आयकर विभागाची नोटीस पाहून बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 06:22 PM2023-10-17T18:22:05+5:302023-10-17T18:22:58+5:30
उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील मजूर रातोरात अब्जाधीश झाला, पण यामुळे तो अडचणीत आला.
बस्ती: उत्तर प्रदेशच्या बस्तीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मजूर रातोरात कोट्यधीश झाला. त्याच्या खात्यात अचानक 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रक्कम आली. बँक खात्यात एवढी रक्कम पाहून त्या मजुराचे डोळे दिपले. मात्र आता ही रक्कम त्याच्यासाठी मोठी अडचणी बनली आहे. आयकर विभागाने त्या व्यक्तीला नोटीस बजावली आहे.
हे प्रकरण बस्तीच्या लालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बटानिया गावचे आहे. शिवप्रसाद निषाद यांच्या घरी प्राप्तिकर विभागाची नोटीस पोहोचताच खळबळ उडाली. शिवप्रसाद दिल्लीत दगड फोडण्याचे काम करतो. एका मजुराच्या घरी आयकर विभागाची नोटीस पोहोचल्याने कुटुंबाला धक्का बसला. नोटीसमध्ये शिवप्रसाद यांच्या बँक खात्यातून 221 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. तसेच, 20 ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
2019 मध्ये पॅन कार्ड हरवले
शिवप्रसाद यांच्या खात्यात एवढे पैसे कसे आले, हे अद्याप समजू शकले नाही. शिवप्रसाद काम सोडून दिल्लीहून यूपीला परतला आहे. दरम्यान, शिवप्रसादने 2019 मध्ये त्याचे पॅनकार्ड हरवल्याची माहिती दिली. त्याच्या पॅनकार्डच्या मदतीने कुणीतरी हे पैसे खात्यात टाकल्याचा अंदाज आहे.
शिवप्रसादची पोलिसात धाव
या संदर्भात शिवप्रसादने लालगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. खात्याचा तपशील काढल्यानंतर या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. शिवप्रसाद आयकर विभाग गाठून आयकर अधिकाऱ्यांना भेटण्याचाही प्रयत्न करत आहेत.