भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 07:09 PM2023-12-08T19:09:06+5:302023-12-08T19:09:29+5:30
कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, यावेळी अचानक महिला-मुलांवर भिंत कोसळली.
UP News:उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. घोसी रेल्वे स्थानकाजवळ ईदगाहची भिंत कोसळल्याने सुमारे 21 महिला आणि मुले ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, इतरांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळाजवळ एका कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, या दुर्घटनेमुळे कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचे विर्झन पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अचानक ईदगाहची भिंत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात तीन महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
आतापर्यंत 21 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी किती महिला आणि मुले आहेत, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मऊ एसपी अविनाश पांडे यांनी सांगितले की, 17 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चार जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत.