आंध्र प्रदेशातील कुटुंबाची वाराणसीत सामूहिक आत्महत्या, सुसाईड नोटने झाला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 07:13 PM2023-12-07T19:13:01+5:302023-12-07T22:27:53+5:30
Varanasi Mass Suicide: मृतांमध्ये आई-वडील आणि दोन तरुण मुलांचा समावेश आहे.
Varanasi Mass Suicide: वाराणसीतील सामूहिक आत्महत्येच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. धर्मशाळेतील एका खोलीत एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. मृत सर्व आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी होते. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या दोन तरुण मुलांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आंध्र प्रदेशातील हे कुटुंब आर्थिक विवंचनेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिने भटकंती केल्यानंतर हे कुटुंब वाराणसीला पोहोचले होते. इथे आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्या केली. आत्महत्येच्या या पद्धतीला 'अॅग्रीमेंट' आत्महत्या म्हणतात. ज्याचा कल आजकाल वाढत आहे. यात काही लोक किंवा कुटुंबातील सदस्य परस्पर संमतीने आत्महत्या करतात.
वाराणसीच्या दशाश्वमेध पोलीस स्टेशन हद्दीतील काशी कैलास भवन धर्मशाळेत ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळपर्यंत या लोकांनी खोली उघडली नाही, यानंतर धर्मशाळेच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून धर्मशाळेची खोली उघडली. खोलीचा दरवाजा उघडताच त्यांना धक्का बसला. खोलीत कुटुंबातील चौघांचे मृतदेह छताला नायलॉनच्या दोरीने लटकलेले होते. पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करून तपास केला. कोंडा बाबू (50), लावण्या (45), राजेश (25) आणि जयराज (23) अशी मृतांची नावे आहेत.
वाराणसीचे पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. त्यांच्याकडे तेलगूमध्ये लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे. सुसाईड नोट वाचल्यावर आंध्र प्रदेशात कुटुंबाचा पैशावरुन वाद झाल्याचे उघड झाले आहे. सुसाईड नोटमध्ये काही जणांवर आरोपही करण्यात आले आहेत. सुसाईड नोटचा हवाला देत त्यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून हे कुटुंब त्रासाला घर सोडून आले होते. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.