परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:46 IST2024-11-14T16:46:13+5:302024-11-14T16:46:32+5:30
युपीपीएससीकडून आरओ-एआरओ परीक्षा दोन दिवस आयोजित करण्यावरून हे आंदोलन पेटले होते. पेपर सेट करण्यावरून देखील हे परीक्षार्थीं निदर्शने करत होते.

परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
प्रयागराजमध्ये युपीपीएससीचे परीक्षार्थीं गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत होते. या परीक्षार्थींवर ना लाठीचार्जचा परिणाम झाला ना पाण्याच्या फवाऱ्याचा. अखेर युपीपीएससीनेच नमते घेतले असून परीक्षार्थींची महत्वाची मागणी मान्य केली आहे.
युपीपीएससीकडून आरओ-एआरओ परीक्षा दोन दिवस आयोजित करण्यावरून हे आंदोलन पेटले होते. पेपर सेट करण्यावरून देखील हे परीक्षार्थीं निदर्शने करत होते. सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून परीक्षार्थीं मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन करत होते. यावरून उत्तर प्रदेशमध्ये राजकारण पेटले होते. सपा अध्यक्ष अखिलेश यादव, बसपा अध्यक्ष मायावती ते भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह आणि जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांनी परीक्षार्थींना पाठिंबा जाहीर केला होता.
शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मंत्री स्वतंत्र देव सिंह यांची भेट घेतली होती. तोवर हे आंदोलन दडपण्याचा देखील प्रयत्न झाला होता. यानंतर युपीपीएससीच्या बोर्डाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळी घेण्याचा निर्णय युपीपीएससीने घेतला आहे.
या परीक्षार्थींनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली होती. त्यांच्यासोबत प्रशासनाने केलेल्या गैरवर्तनाची यात ते तक्रार करणार होते. मंगळवारी रात्री उशिरा 11 आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. कोचिंग इन्स्टिट्यूटच्या होर्डिंगची तोडफोड करणे व परीक्षार्थींना भडकविणे असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. यातील तिघांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे.