सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:14 PM2024-10-24T13:14:08+5:302024-10-24T14:34:32+5:30

Uttar Pradesh Assembly Bypolls: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करहल विधानसभा मतदारसंघात भाजपाने मोठी खेळी केली आहे. भाजपाने या जागेवर अखिलेश यादव यांचे भाओजी अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे.

Uttar Pradesh Assembly Bypolls: Akhilesh Yadav's brother-in-law Anujesh Yadav has been nominated by the BJP in Karhal, a stronghold of the Samajwadi Party | सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी

सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी

लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात धक्कादायक निकाल उत्तर प्रदेशमध्ये लागले होते. येथे भाजपाची जबरदस्त पिछेहाट झाली होती. तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडी मुसंडी मारली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ९ जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक ही राज्याच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करहल विधानसभा मतदारसंघात भाजपाने मोठी खेळी केली आहे. भाजपाने या जागेवर अखिलेश यादव यांचे भाओजी अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे तेजप्रताप यादव यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे येथे मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातच लढत रंगणार आहे. 

लोकसभेवर निवडून गेल्यावर अखिलेश यादव यांनी करहल विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने ७ जागांवरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातील अनुजेश यादव यांची उमेदवारी लक्षवेधी ठरली आहे. अनुजेश यादव हे मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबाचे जावई आहेत. ते मुलायम सिंह यादव यांचे बंधू अभयराम यादव यांची मुलगी संध्या यादव यांचे पती आहेत. संध्या यादव ह्या आझमगडमधील खासदार धर्मेंद्र यादव यांच्या भगिनी आहेत. संध्या यादव ह्या मैनपुरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. दरम्यान, काही काळापूर्वी संध्या यादव आणि अनुजेश यादव यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. अनुजेश यादव यांचं कुटुंब आधीपासूनच राजकारणामध्ये आहे. तसेच समाजवादी पक्षाशी संबंधित आहे. त्यांची आई उर्मिला यादव ह्या घिरोर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

दरम्यान, करहलमध्ये अनुजेश यादव यांना उमेदवारी जाहीर करतानाच भाजपाने इतर मतदारसंघातील उमेदवारांचीही घोषणा केली आहे. त्यात गाझियाबादमधील सदर येथून संजीव शर्मा, कुंदरकी येथून रामवीरसिंह ठाकूर, खैर येथून सुरेंद्र दिलेर, फूलपूर येथून दीपक पटेल, कटेहरी येथून धर्मराज निषाद आणि मझवां येथून सुचिस्मिता मौर्य यांना उमेदवारी दिली आहे.   
 

Web Title: Uttar Pradesh Assembly Bypolls: Akhilesh Yadav's brother-in-law Anujesh Yadav has been nominated by the BJP in Karhal, a stronghold of the Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.