बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 02:26 PM2023-11-27T14:26:13+5:302023-11-27T14:27:51+5:30
महापालिका निवडणूक काळात या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती...
भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोरांची पुन्हा घर वापसी करत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कार्यक्रम पार पडेल. ही संख्या अंदाजे 5 हजार एवढी आहे. महापालिका निवडणूक काळात या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती.
भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीच्या काळात कसल्याही प्रकारची चूक होऊ देऊ इच्छित नाही. यामुळेच पक्षाने आपल्या जुन्या बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पक्षात घेण्याच्या विचार केला आहे. महापालिका निवडणूक काळात ज्या उमेदवारांना तिकीट मिळाले नाही, त्या उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांची संख्या जवळपास 5 हजार एवढी आहे. भाजपने त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आता या सर्वांची घरवापसी करण्यासंदर्भात राज्य संघटनेने निर्णय घेतला आहे. यानुसार, आज पहिल्या टप्प्यात लखनौच्या अवध भागातील बंडखोरांना पुन्हा एकदा पक्षात घेतले जाणार आहे.
आजपासून होईल सुरुवात -
भारतीय जनता पक्ष आजपासून आपल्या बंडखोरांच्या घरवापसीला सुरवात करेल. आज पहिल्या टप्प्यात अवध भागातील बंडखोरांना परत घेतले जाणार आहे. आज, सुमारे 30 ते 35 बंडखोरांना लखनौ येथील मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि अवध प्रदेशाध्यक्ष कमलेश मिश्रा यांच्या उपस्थितीत या लोकांची घरवापसी होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात सुमारे 250 बंडखोर भारतीय जनता पक्षात परतणार आहेत. यात 14 माजी नगरसेवक, तीन माजी नगराध्यक्ष आणि काही प्रभाग अध्यक्षांचाही समावेश असेल. याशिवाय, जिल्हा पातळीवरही बंडखोरांची यादी तयार करण्याची जबाबदारी जिल्हा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. आगामी काळात हे बंडखोरही भारतीय जनता पक्षात दिसू शकतात.