योगींनी रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्याला स्मार्टफोन दिला, बाहेर पडताच चोरट्यांनी पळवून नेला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 09:36 AM2024-09-20T09:36:21+5:302024-09-20T09:37:05+5:30

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये एका दिव्यांग व्यक्तीला स्मार्टफोन दिला होता. मात्र हा विद्यार्थी स्मार्टफोन घेऊन बाहेर पडला असता एका व्यक्तीने त्याच्याकडील स्मार्टफोन हिसकावून घेतला.

Uttar Pradesh Crime News: Yogi gave a smartphone to a student at a job fair, thieves took it away as soon as he came out | योगींनी रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्याला स्मार्टफोन दिला, बाहेर पडताच चोरट्यांनी पळवून नेला

योगींनी रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्याला स्मार्टफोन दिला, बाहेर पडताच चोरट्यांनी पळवून नेला

उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीत बऱ्यापैकी सुटला असल्याचे दावे केले जातात. मात्र हे दावे फोल ठरवणारी घटना बुधवारी गाझियाबादमध्ये घडली. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये एका दिव्यांग व्यक्तीला स्मार्टफोन दिला होता. मात्र हा विद्यार्थी स्मार्टफोन घेऊन बाहेर पडला असता एका व्यक्तीने त्याच्याकडील स्मार्टफोन हिसकावून घेतला. या प्रकरणी घंटाघर पोलीस चौकीतील पोलिसांनी विद्यार्थ्यांची तक्रार नोंदवून घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एमएमएच कॉलेजमधून एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मनोज याला बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमामध्ये स्मार्टफोन दिला होता. घंटाघर रामलीला मैदानामध्ये आयोजित रोजगार मेळाव्यानंतर कुठल्यातरी अज्ञात व्यक्तीने हा स्मार्टफोन पळवला.

याबाबत माहिती देताना विद्यार्थी मनोज याने सांगितले की, जेव्हा माझ्याकडील मोबाईल हिसकावण्यात आला, तेव्हा मी खूप आरडाओरडा केला. मात्र तिथे लाऊड स्पीकर सुरू असल्याने माझा आवाज कुणी ऐकू शकला नाही. पीडित मनोज हा अफजलपूर पावटी गावातील रहिवासी आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त रितेश त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच या चोराबाबत अद्याप तरी कुठलीही माहिती मिळालेली नाही.

योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी रोजगार मेळावा कार्यक्रमामधून तरुणांना ६ हजार स्मार्टफोन आणि टॅब वितरित केले होते. यावेळी नोंदणीकृत एक हजार बेरोजगार तरुणांना नियुक्तीपत्रं देण्यात आली होती.  

Web Title: Uttar Pradesh Crime News: Yogi gave a smartphone to a student at a job fair, thieves took it away as soon as he came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.