रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 07:01 PM2024-05-21T19:01:31+5:302024-05-21T19:06:58+5:30
Uttar Pradesh Hospital News: जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने मृत्यू झालेल्या रुग्णाची ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन बाहेरून करून आणण्यासा सांगितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील एका रुग्णालयात घडली आहे.
जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने मृत्यू झालेल्या रुग्णाची ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन बाहेरून करून आणण्यासा सांगितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील एका रुग्णालयात घडली आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर हा डॉक्टर लिहून दिलेला कागद फाडून रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर याबाबतची तक्रार मृताच्या नातेईवाईकांनी केल्यानंतर सीएमओसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तीन दिवसांत चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सीएमओने सांगितले.
ही संपूर्ण घटना बांदा जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमधील आहे. बदौसा परिसरातील दुबरिया येथे राहणाऱ्या ८२ वर्षीय भोला पाल यांची तब्येत सोमवारी सकाळी बिघडली. त्यानंतर नातेवाईक त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. तिथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णास जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. नातेवाईक रुग्णाला घेऊन जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता तिथे रुग्णाचा मृत्यू झाला.
पुढे घडलेल्या घटनेबाबत नातेवाईकांनी सांगितले की, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्वरित ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करण्यासाठी लहून दिले. मात्र रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आम्ही डॉक्टरांना दिली. एवढंच नाही तर डॉक्टरांनी तपासणी करण्यासाठी लिहून दिल्यानंतर त्वरित एक खासगी रुग्णवाहिका आली. तसेच मृतदेहाला उचलून रुग्णवाहिकेत ठेवून नेऊ लागले. मात्र याविरोधात संताप व्यक्त केल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी तिथे आली.
नातेवाईकांनी पुढे आरोप केला की, आरोग्य सुविधांबाबत सरकारला काळजी आहे. मात्र डॉक्टर लुटण्याचं काम करतात. रुग्णाचा मृत्यू झाला असतानाही कमिशनखोरीमुळे डॉक्टरांनी हजारो रुपयांच्या चाचण्या करण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांनी चिठ्ठी मागितली तेव्हा त्याने ती दिली नाही. तसेच धमकी देऊन तो तिथून पसार झाला. आता मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करून कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, बांदा येथील सीएमओ डॉक्टर अनिल कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी मी रुग्णालयाला भेट दिली होती. नातेवाईकांशी चर्चा केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर एक तपास समितीही स्थापन केली आहे. ३ दिवसांमध्ये तपास अहवाल येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.