'बाबा मला वाचवा, 10 लाख पाठवा...' प्रियकराच्या मदतीने रचला स्वतःच्या अपहरणाचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:18 PM2023-08-07T18:18:27+5:302023-08-07T18:19:38+5:30
आयआयटीमध्ये निवड झालेली तरुणी प्रियकरासोबत पळून गेली. पैसे संपले म्हणून स्वतःच्या अपहरणाचा कट रचला.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. संशयास्पद परिस्थितीत अपहरण झालेल्या तरुणीला बस्ती जिल्ह्यात पकडण्यात आले आहे. तरुणीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने अपहरणाचा खोटा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. तरुणीने प्रियकराच्या घरातच स्वतःचा व्हिडीओ बनवून 10 लाख रुपयांची खंडणीही मागितली होती. जाणून घेऊ संपूर्ण प्रकरण...
मिळालेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी हंसिका वर्मा नावाची तरुणी अपहरणाचे कारण सांगत, आपल्या प्रियकर राज सिंहसोबत पळून गेली. तरुणीने प्रियकरासोबत 22 मे 2023 रोजी कोर्ट मॅरेज केल्याचे तपासात समोर आले. दोघांकडे जगण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने अपहरणाचा कट रचला आणि वडिलांकडे पैशांची मागणी केली.
तरुणीची आयआयटीमध्ये निवड झाल्यानंतर तिच्या अपहरणाची बाब समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आणि तरुणीच्या शोधासाठी पथके रवाना केले. तपासादरम्यान तरुणीनेच आपल्या अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले.
पोलिस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितल्यानुसार, कानपूर पोलिसांच्या विशेष पथकाने तरुणीला आणि तिच्या प्रियकरासोबत बस्ती जिल्ह्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. सोशल मीडियावर हंसिकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ती 'बाबा मला वाचवा...' अशी ओरडत होती. चौकशीत तरुणीने अपहरणाचा बनाव केल्याचे कबुल केले आणि हा व्हिडिओही खोटा असल्याचे सांगितले.
एसीपी अभिषेक पांडे यांनी सांगितले की, तरुणीच्या जबानीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल आणि अपहरणाचा कट रचून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपींना बस्ती जिल्ह्यातून कानपूरला आणले आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.