भाजपा उमेदवाराला पत्नीने दिले आव्हान, अपक्ष निवडणूक लढवणार, या मतदारसंघात पती विरुद्ध पत्नी लढत रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:20 AM2024-04-25T10:20:42+5:302024-04-25T10:22:04+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमधील इटावा मतदारसंघातून (Etawah Lok Sabha constituency) भाजपाने रामशंकर कठेरिया यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारही सुरू केला आहे. मात्र रामशंकर कठेरिया यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी मृदुला कठेरिया यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या विजयात उत्तर प्रदेशची भूमिका महत्त्वाची ठरली होती. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयामुळे भाजपाला केंद्रात बहुमतासह सत्ता मिळवणे शक्य झाले होते. त्यामुळे यावेळीही उत्तर प्रदेशमधून चांगल्या कामगिरीची भाजपाला अपेक्षा असेल. मात्र काही मतदारसंघामध्ये नाराजी आणि बंडखोरीने भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील इटावा मतदारसंघातून भाजपाने रामशंकर कठेरिया यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारही सुरू केला आहे. मात्र रामशंकर कठेरिया यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी मृदुला कठेरिया यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. एकीकडे समाजवादी पक्षाचे उमेदवार जितेंद्र दोहरे यांनी आव्हान दिलेले असताना पत्नीही विरोधात उतरल्याने रामशंकर कठेरिया यांची चिंता वाढली आहे.
रामशंकर कठेरिया यांची पत्नी मृदुला कठेरिया यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मात्र यावेळी लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्यांचं स्वातंत्र्य आहे, महिलांनाही अधिकार मिळाले पाहिजेत, म्हणून मीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मी उमेदवारी मागे घेणार नाही. प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने माझा विजय होईल, असे त्यांनी सांगितले.
रामशंकर कठेरिया हे आग्रा येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठामध्ये हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत. ते लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले होते. आग्रा येथून ते दोन वेळा निवडून आले होते. तर २०१९ मध्ये पक्षाने त्यांना इटावा येथून उमेदवारी दिली होती. तेव्हा ते इटावा येथूनही विजयी झाले होते. त्या निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा ६५ हजार मतांनी पराभव केला होता. रामशंकर कठेरिया यांना भाजपाने २०१४ मध्ये राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त केले होते. तसेच त्यांनी मोदी सरकारमध्ये मनुष्यबळ विकासमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.