अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:52 PM2024-05-24T18:52:41+5:302024-05-24T18:54:35+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपाला पाठिंबा देणारी अल्पसंख्याक महिला आणि तिच्या कुटुंबीयांना गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपाला पाठिंबा देणारी अल्पसंख्याक महिला आणि तिच्या कुटुंबीयांना गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पीडित अल्पसंख्याक महिला भाजपा कार्यकर्ता सबा नाझ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी भादंवि कलम १४७, ३२३, ५०४,५०६, ४५२ आणि ३५४(ख) अन्वये एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार २२ मे रोजी सबा नाझ यांचा मुलगा आणि मुलगी घराबाहेर उभे राहून लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करत होते. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, अशी चर्चा त्यांच्यात सुरू होती. ही बाब तिथून जात असलेल्या सलीम नावाच्या गल्लीतील गुंडाला आवडली नाही. त्याने मोदी सरकार येणार नाही, असे सांगत सबा नाझ यांच्या मुलांना शिविगाळ केली. तसेच मग बघून घेण्याची धमकी दिली.
दरम्यान, २२ मे रोजी रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास सलीम पन्नी आणि त्याचे पाच सहा सहकारी घरी आले. ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी नऊ वर्षांच्या मुलाकडून दरवाजा उघडून घेतला. घरात आल्यावर त्यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच सबा नाझ आणि त्यांच्या मोठ्या मुलीला मारहाण केली. तसेच छोट्या मुलीलाही मारहाण करून तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मुलांनी आरडाओरडा करताच आरोपी फरार झाले.
पीडिता सबा नाझ यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले. तर सलीम पन्नी आणि त्याचे सहकारी धमकी देऊन निघून गेले. त्या पुढे म्हणाल्या की,माझे पती सुफियान अहमद आणि मी भाजपाचं काम करतो. तसेच सुफियान अहमद हे भाजपा मुस्लिम मंचामध्ये सहसंयोजकही आहेत. आम्ही भाजपाला पाठिंबा देत असल्याने नाराज असलेल्या सलीम पन्नी याने याआधीही असं कृत्य केलेलं आहे, असा आरोपही सबा नाझ यांनी केला.
दरम्यान, या घटनेमुळे आपलं कुटुंब दहशतीखाली असून, पोलिसांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीविताचं रक्षण करावं, अशी विनंती सबा नाझ यांनी केली आहे. मात्र या घटनेनंतरही आपला योगी सरकारवर विश्वास असून, यापुढेही आपण भाजपाचा प्रचार करत राहू, असे सबा नाझ यांनी सांगितले