सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 04:25 PM2024-06-29T16:25:55+5:302024-06-29T16:27:42+5:30

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीक उत्तर प्रदेशचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले होते. तसेच त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवाबाबतचं चिंतन आणि मंथन भाजपामध्ये (BJP) जोरदार सुरू आहे.

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 Result: Strong party organization, popularity of Modi, Yogi, still why BJP lost in UP? Shocking information from the report  | सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीक उत्तर प्रदेशचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले होते. तसेच त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मागच्या दोन निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात निर्विवाद विजय मिळवणाऱ्या भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. आता पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवाबाबतचं चिंतन आणि मंथन भाजपामध्ये जोरदार सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक लखनौमध्ये झाली. या बैठकीत पक्षाचा पराभव झालेल्या जागांचा आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत विशेष टीमने तयार केलेला आढावा अहवालही सादर केला. त्यात पराभवाबाबतची काही धक्कादायक कारणं नमूद करण्यात आली आहेत.  

या अहवालामध्ये नेत्यांकडून जनता आणि कार्यकर्त्यांना दिली गेलेली वागणूक आणि पक्षविरोधी कारवायांचा उल्लेख करण्यात आला आगे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आढावा घेत असलेल्या भाजपाच्या विशेष टीमने हा विस्तृत अहवाल राज्याच्या नेतृत्वाकडे सुपुर्द केला आहे. या अहवालात पराभवाची अनेक कारणं नमूद करण्यात आली आहेत.

विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाचं नुकसान झालं. एवढंच नाही, तक अनेक आमदार हे आपल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांच्या विरोधात होते. तसेच अशा मतदारसंघांमध्ये पक्षविरोधी काम केलं गेलं, असे या अहवालात म्हटलं आहे. त्याबरोबरच संविधान बदललं जाईल, असे दावे केले गेल्याने मागासवर्गीय मतदार दुरावले. तसेच ओबीसी मतदारही दुरावले. या सर्वाचा परिणाम म्हणून भाजपाचा दारुण पराभव झाला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

तसेच कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी आणि नेत्यांबाबत असलेल्या नाराजीमुळे भाजपाच्या बाजूने मतदान कमी झालं. तसेच खूप प्रयत्न करूनही ओबीसी मतदारांमधील फूट टाळता आली नाही. तसेच संविधानाच्या मुद्द्यावरून मागासवर्गीय मतं दुरावली. भाजपाच्या विशेष समितीने तीन टप्प्यांमध्ये हा अहवाल तयार केला आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षाचं भक्कम संघटन, राम मंदिरामुळे आलेली लाट यामुळे उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. मात्र भाजपाला केवळ ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपाच्या मित्रपक्षांना ३ जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाने ३७ आणि काँग्रेसने ६ जागांवर विज मिळवला. तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली. एकेकाळी उत्तर प्रदेशातील मोठी शक्ती असलेल्या बसपाला एकही जागा मिळाली नाही.  

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 Result: Strong party organization, popularity of Modi, Yogi, still why BJP lost in UP? Shocking information from the report 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.