‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:58 AM2024-05-07T11:58:25+5:302024-05-07T11:59:21+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक रामगोपाल यादव यांनी राम मंदिराबाबत मोठं विधान केलं आहे. ते मंदिर बेकार आहे, मंदिर असं बांधलं जात नाही. राम मंदिराचा नकाशा योग्य नाही. ते वास्तुशास्त्राच्या हिशेबाने योग्य रीत्या बांधलेले नाही, असा दावा रामगोपाल यादव यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमधील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा प्रचारामधील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक रामगोपाल यादव यांनी राम मंदिराबाबत मोठं विधान केलं आहे. ते मंदिर बेकार आहे, मंदिर असं बांधलं जात नाही. राम मंदिराचा नकाशा योग्य नाही. ते वास्तुशास्त्राच्या हिशेबाने योग्य रीत्या बांधलेले नाही, असा दावा रामगोपाल यादव यांनी केला आहे.
याआधी राम नवमी दिवशी समाजवादी पक्षाचे खासदार असलेल्या रामगोपाल यादव यांनी राम मंदिराबाबतही विधान केलं होतं. त्यावेळी भाजपावर टीका करताना रामगोपाल यादव म्हणाले होते की, रामनवमी नेहमीच उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता काही लोकांनी राम नवमीचं पेटंट करून घेतलं आहे. ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता नाही, असा टोला त्यांनी लगावला होता.
कोट्यवधी लोक हजारो वर्षांपासून रामनवमी साजरी करत आहेत. तसेच देशामध्ये केवळ एकच राम मंदिर नाही आहे. त्यांनी मंदिरामध्ये अपूर्ण प्राणप्रतिष्ठापना केली आहे. तसेच शंकराचार्यही त्याच्याविरोधात होते. भाजपाला याची शिक्षा मिळणार आहे. मी कधी कुणाची पूजा केलेली नाही. मी दिखावा करत नाही. मी देवाचं नाव घेतो, पण मी पाखंडी नाही. पाखंडी माणसं हे सारं करतात. श्री राम त्यांना शिक्षा देतील, असा टोला रामगोपाल वर्मा यांनी लगावलाय.
यावर्षी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये श्री रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं.