म्हैशीला रेडकू झालं, शेतकऱ्याने पोलिसांना फोन करून बोलावलं, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 04:21 PM2024-06-27T16:21:00+5:302024-06-27T16:25:08+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील खुशहालपूर गावामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडील म्हैशीला रेडकू झाल्यानंतर डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतलं. पोलीसही तातडीने शेतकऱ्याकडे हजर झाले.
उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील खुशहालपूर गावामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडील म्हैशीला रेडकू झाल्यानंतर डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतलं. पोलीसही तातडीने शेतकऱ्याकडे हजर झाले. त्यांनी फोन करण्यामागचं कारणं विचारलं. त्यावेळी शेतकऱ्याने मला कुठल्याही मदतीची गरज नाही. तर मी तुम्हाला म्हैशीचं दूध पिण्यासाठी बोलावले होते. हे ऐकून पोलीस अवाक् झाले, त्यांनी पुन्हा असं न करण्याची ताकिद संबंधित शेतकऱ्याला दिली आणि दूध न पिताच माघारी परतले.
रहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुशहालपूर गावातील शेतकरी जसवीर सिंह याच्याकडे गाभण असलेल्या म्हैशीने नुकताच एका रेडकूला जन्म दिला होता. तेव्हा गावातील एका कुरापतखोर तरुणाने म्हैशीचं दूध पिण्यासाठी पोलिसांना बोलव असा सल्ला जसवीर याला दिला. मात्र जसवीरने कुठलाही विचार न करता डायल ११२ वर फोन करून पोलिसांना मदतीचा बहाणा करून बोलावले. सुमारे दहा मिनिटांनी पोलीस त्या शेतकऱ्याच्या घरी दाखल झाले. त्यांनी फोन करण्यामागचं कारणं विचारलं तेव्हा शेतकऱ्यानं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसांनी डोक्याला हात लावला.
हा संपूर्ण प्रकार एका पोलीस कर्मचाऱ्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये संबंधित शेतकरी माझ्यासोबत काहीही गुन्हा घडलेला नाही. मी केवळ माझ्याकडील म्हैस व्यायली, तिचं दूध पिण्यासाठी पोलिसांना बोलावलं होतं, असं सांगताना दिसत आहे. त्यावर पोलिसांना या शेतकऱ्याला तुला आमची नावं माहिती आहेत का? असं विचारलं. तेव्हा त्याने मला तुमची नावं माहिती नाहीत. मात्र याला तुमची नावं माहिती आहेत, असं एका दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवत सांगितलं.
विनाकारण बोलावण्यात आल्याने काहीशा रागावलेल्या पोलिसांनी मत पुन्हा असा प्रकार न करण्याची ताकिद संबंधित शेतकऱ्याला दिली. तसेच डायल ११२ हा क्रमांक आणीबाणीच्या प्रसंगी मदत मिळवण्यासाठी आहे, असेही त्या शेतकऱ्याला समजावून सांगितले. त्यामुळे या सुविधेचा गैरवापर करून पोलिसांचा वेळ वाया घालवू नका असे आवाहनही केले.