ज्ञानवापी प्रकरण: मुस्लीम पक्षकारांना कोर्टाचा दणका! ASI सर्वेक्षणाला दिली मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:19 PM2023-07-21T17:19:03+5:302023-07-21T17:19:31+5:30
Gyanvapi Survey: हिंदू पक्षकारांनी न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती मागणी
Gyanvapi Survey: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळील माँ शृंगार गौरी-ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने 'एएसआय'च्या सर्वेक्षणाला मान्यता दिली आहे. 14 जुलै रोजी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर संपूर्ण ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्व आणि वैज्ञानिक तपासणीच्या मागणीवरील निर्णय राखून ठेवला होता. 21 जुलै रोजी निर्णय दिला जाईल, असे सांगितले होते. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश ए.के.विश्वेश यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २१ जुलैपर्यंत निकाल राखून ठेवला होता. आज ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू बाजूचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी निकालाची प्रत वाचली आणि सांगितले की न्यायालयाने एएसआय सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.
हिंदू पक्षाने वुजुखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे ASI सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्याच वेळी मुस्लिम पक्ष आणि मस्जिद कमिटीने या मागणीला विरोध करत निषेध नोंदवला होता. ASI सर्वेक्षणाची मागणी वाराणसीतील 4 महिलांच्या वतीने करण्यात आली आहे. लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक अशी त्यांची नावे आहेत. या महिलांनी 16 मे रोजी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात याचिका दाखल करून वुजुखाना वगळता सर्व भागांचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली होती.
14 जुलै रोजी हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले होते, 'आम्ही वुजुखाने वगळता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाची पुरातत्व आणि वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी न्यायालयासमोर ठेवली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. ते पुढे म्हणाले की, त्यांनी आपल्या युक्तिवादात काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशीद वाद संपूर्ण मशीद संकुलाच्या पुरातत्व तपासणीद्वारेच सोडवला जाऊ शकतो, असे न्यायालयाला सांगितले. त्यांनी सांगितले की, पुरातत्व सर्वेक्षणामुळे संकुलाचे नुकसान होऊ शकते असा मुस्लीम पक्षाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला, त्यावर आम्ही न्यायालयासमोर संकुलाचे नुकसान न करता आधुनिक पद्धतीने तपास करण्याची मागणी केली.
22 मे रोजी, मुस्लिम बाजूने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आपला आक्षेप नोंदवला आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला ज्ञानवापी मशिदीच्या संपूर्ण संकुलाचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली.