"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 07:42 AM2024-05-24T07:42:51+5:302024-05-24T07:43:19+5:30
निवडणूक सभांमध्ये वरुण गांधी यांनी आपले तिकीट रद्द झाल्याबद्दल काहीही वक्तव्य केले नाही. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली नाही. आमचे कोणाशीही वैर नाही, राग नाही. मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे, असे ते म्हणाले.
राजेंद्र कुमार
सुलतानपूर : पिलीभीतमधून तिकीट नाकारल्यानंतर प्रथमच भाजप खासदार वरुण गांधी रॅली काढण्यासाठी सुलतानपूरमध्ये आले. वरुण यांची आई मनेका गांधी सुलतानपूरमधून ९व्यांदा निवडणूक लढवत आहेत. निवडणूक सभांमध्ये वरुण गांधी यांनी आपले तिकीट रद्द झाल्याबद्दल काहीही वक्तव्य केले नाही. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली नाही. आमचे कोणाशीही वैर नाही, राग नाही. मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे, असे ते म्हणाले.
भर सभेत मोबाइल क्रमांक दिला अन् म्हणाले...
- वरुण गांधी म्हणाले की, जेव्हा मी दहा वर्षांपूर्वी निवडणूक लढवण्यासाठी येथे आले होते, तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की, रायबरेली आणि अमेठीमध्ये जसा विकास आहे तसाच सुलतानपूरमध्येही असावा. आज सुलतानपूर हा देशातील आघाडीचा जिल्हा आहे.
- सुलतानपूरची देशभरात ख्याती आहे. यावेळी त्यांनी मंचावरून सर्वांना आपला मोबाइल क्रमांक दिला आणि केव्हाही गरज असेल तेव्हा फोन करा, असे लोकांना सांगितले. यावेळी त्यांनी मनेका गांधींच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रचारातून भाजपचे बडे नेते गायब
नेहरू-गांधी घराण्याची पारंपरिक जागा असलेल्या अमेठीजवळील सुलतानपूर येथील भाजप उमेदवार मनेका गांधी यांच्या प्रचारातून पक्षाचे बडे नेते गायब आहेत. यामुळे जागा जिंकण्यासाठी मनेका गांधी यांना एकट्याने प्रचार करावा लागत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे एकही विरोधी पक्ष नेता त्यांच्या विरोधात प्रचार करत नाही. या जागेवर त्यांची स्पर्धा सपाचे उमेदवार के राम भुआल निषाद यांच्याशी असून दोघांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे मानले जात आहे.