हृदयद्रावक! शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी गेले अन् एकाच कुटुंबातील चौघे दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 08:28 AM2023-05-29T08:28:03+5:302023-05-29T09:37:45+5:30
५ जण शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी टाकीतील विषारी वायूमुळे चौघेही चक्कर येऊन पडले.
कुशीनगर - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या ४ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत १ जण जखमीही आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. नेबुआ नौरंगियातील बहोरा रामपूर येथील ही घटना आहे. ज्याठिकाणी नंद कुशवाहा कुटुंबातील नितेश, आनंद, दिनेश आणि राजकुमार यांचा मृत्यू झाला आहे.
हे ५ जण शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी टाकीतील विषारी वायूमुळे चौघेही चक्कर येऊन पडले. बेशुद्ध अवस्थेत ५ जणांना उपचारासाठी कोटवा येथील सीएचसी रुग्णालयात आणले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर अन्य तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु जिल्हा रुग्णालयात जाताना अन्य २ जण दगावले. याप्रकारे या घटनेत एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
गावकऱ्यांचा आरोप
दरम्यान, या प्रकरणानंतर गावकऱ्यांनी आरोप केलाय की, रुग्णवाहिका वेळेवर पोहचली नाही अन्यथा आणखी जीव वाचले असते. घटनेनंतर जिल्हाधिकारी रमेश रंजन आणि पोलीस अधीक्षक धवल जायस्वाल घटनास्थळी पोहचले तिथे मृतांच्या कुटुंबाशी संवाद साधला. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला. यापुढे टाकी साफ करण्यासाठी प्रोफेशनला बोलवणार, स्वत: साफ करण्याच्या नादात जीव जाण्याची भीती गावकऱ्यांना बसली आहे. अत्याधुनिक पद्धतीने टाकी साफ केली जाऊ शकते असं गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.