राम मंदिरात प्रवेश करताना नियम काय? २४ तास सुरक्षेसाठी बसविली हायटेक उपकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 02:19 PM2024-01-08T14:19:04+5:302024-01-08T14:19:24+5:30
मंदिरात कशावर बंदी? ड्रेसकोड काय? जाणून घ्या नियम
अयोध्या : २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रामजन्मभूमीच्या चोवीस तास सुरक्षेसाठी हायटेक उपकरणे बसवण्यात आली आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सर्वांना राम मंदिरात येऊ दिले जाणार नाही.
सोहळ्यादिवशी राम मंदिर ट्रस्टचे निमंत्रण पत्र असलेल्या लोकांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे निमंत्रण पत्रिका नाही किंवा ज्यांना निमंत्रण दिलेले नाही त्यांना त्या दिवशी प्रवेश दिला जाणार नाही. आमंत्रित पाहुण्यांव्यतिरिक्त, कार्यक्रमाशी संबंधित लोक, सुरक्षा किंवा इतर व्यवस्था ड्युटी करणारे कर्मचारी यांनाच त्या दिवशी प्रवेश मिळेल.
नेमकी कशावर बंदी?
राम मंदिरात प्रवेश करणाऱ्यांना मोबाइल, पर्स, इअरफोन्स, रिमोटच्या चाव्या यांसारखे गॅझेट घेऊन जाण्याची परवानगी नसेल. साधूंना पूजेसाठी छत्र, पिशवी, सिंहासन, गुरू पादुका घेऊन जाण्यास मनाई आहे.
अशा वस्तू ठेवण्यासाठी लॉकर बनवण्यात आले आहेत.
कोणता ड्रेसकोड?
- राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी दाखल व्हावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही व्यक्तीसोबत सुरक्षा कर्मचारी असतील तर ते देखील कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या आवारातून बाहेर पडल्यानंतरच रामलल्लाचे दर्शन घेता येईल.
- भारतीय परंपरेनुसार कपडे परिधान करून राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहता येईल. पुरुष धोतर, गमछा, कुर्ता-पायजमा आणि महिला सलवार सूट किंवा साडीमध्ये जाऊ शकतात. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.