तिच्यासाठी कायपण... चालण्यावरुन संशय, ग्रामस्थांनी बुरखा फाडला अन् निघाला युवक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 03:10 PM2023-07-24T15:10:55+5:302023-07-24T15:27:28+5:30
ग्रामस्थांनी बुरखाधारी युवकाला पकडून जबर मारहाण केली. तसेच, पोलिसांनाही घटनास्थळी बोलावले.
शहाजहाँपूर - कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी महिलांना असलेल्या मोफत बससेवेचा लाभ घेण्यासाठी एका पुरुषाने बुरखा परिधान करुन बसमधून प्रवास केला होता. मात्र, त्याच्या संशयित हालचालीवरुन त्याचा भांडाफोड झाल्याची बातमी चांगलीच व्हायरल झाली होती. आता, उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील जलालाबाद क्षेत्रातील एका युवकाने प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा घालून तिच्या गावात प्रवेश केला. मात्र, त्याच्या चालण्यावरुन संशय आल्याने ग्रामस्थांनी त्याचा बुरखा फाडला असता ती नसून तो असल्याचे समोर आले.
ग्रामस्थांनी बुरखाधारी युवकाला पकडून जबर मारहाण केली. तसेच, पोलिसांनाही घटनास्थळी बोलावले. त्यानंतर, चौकशीअंती प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. जलालाबाद येथील या युवकाचे त्याच्या नातलगात असलेल्या तरुणीवर प्रेम होते. जी तरुणी जवळील गावातच राहत होती. त्यामुळे, शनिवारी तो युवक बुरखा परिधान करुन तिच्या गावात पोहोचला. मात्र, गावकऱ्यांनी त्याच्या संशयित हालचालीवरुन त्याला पकडले, बुरख्यात युवक असल्याने गावातील इतरही मंडळी एकत्र आली व, त्यांनी तरुणाला मारहाण केली.
दरम्यान, यावेळी आपणास मारहाण न करण्याची विनंती करत युवकाने हात जोडले. मात्र, काहींना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तसेच, ह्या युवकाने सर्व प्रेमकहाणीही ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेतले. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही, पण पोलिसांकडून युवकाची चौकशी सुरू आहे.