Pension: जिवंत पतीला मृत दाखवत पत्नीने लाटली तीन वर्षे पेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 07:39 AM2023-06-30T07:39:09+5:302023-06-30T07:40:00+5:30
Pension: पती-पत्नीमधील नाते हे प्रेमाचे, विश्वास, आपुलकीचे असल्याचे म्हटले जाते. एकमेकांवर विश्वास ठेवत दोघेही आयुष्याचा गाडा हाकत असतात, परंतु एखाद्या जोडीदाराकडून विश्वासघातही केल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात.
पती-पत्नीमधील नाते हे प्रेमाचे, विश्वास, आपुलकीचे असल्याचे म्हटले जाते. एकमेकांवर विश्वास ठेवत दोघेही आयुष्याचा गाडा हाकत असतात, परंतु एखाद्या जोडीदाराकडून विश्वासघातही केल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. जिवंत पतीलाच मृत दाखवत त्याच्या नावावर एका महिलेने तब्बल तीन वर्षे पेन्शन लाटल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे याबाबत पतीला कुठलीही कल्पना नव्हती. ही बाब सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.
उत्तर प्रदेशच्या सरायखेमा गावातील गुडिया नामक महिलेचा २००४ मध्ये विकास नामक युवकाशी विवाह झाला. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात वारंवार वाद व्हायला लागले. रोजच्या भांडणाला कंटाळून गुडिया सासर सोडून माहेरी राहण्यास आली. २०१९ मध्ये गुडियाने बनावट कागदपत्रांच्या मदतीने पतीचे निधन झाल्याचे सांगत विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज केला. सुमारे तीन वर्षे तिने या योजनेचा लाभ घेतला. पती विकासला हा प्रकार माहिती झाला, तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याने तातडीने याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार महिलेची पेन्शन रोखण्यात आली असून तिच्याकडून संबंधित रक्कम परत मिळण्याची कारवाई सुरू आहे.