उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बदलणार? अंतर्गत वादादरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 04:12 PM2024-07-26T16:12:16+5:302024-07-26T16:12:56+5:30
Uttar Pradesh Politics Update: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला अनपेक्षितपणे दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमने-सामने आले आहेत. त्यामुळे भाजपा उत्तर प्रदेशमध्ये नेतृत्व परिवर्तन करून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपाच्याउत्तर प्रदेशमधील पक्ष संघटनेमध्ये वादाचे फटाके फुटत आहेत. राज्यात भाजपाला अनपेक्षितपणे दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमने-सामने आले आहेत. त्यात केशव प्रसाद मौर्य यांनी तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. त्यामुळे भाजपा उत्तर प्रदेशमध्ये नेतृत्व परिवर्तन करून योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता उत्तर प्रदेशमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी नेतृत्व परिवर्तनाबाबत मोठं विधान केलं आहेत. भाजपा उत्तर प्रदेशमध्ये नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बदलणार असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत, असे भूपेंद्र चौधरी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश भाजपामध्ये घडत असलेल्या घडामोडींबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतीय जनता पक्ष एक लोकशाहीवादी पक्ष आहे. येथे सर्वांना आपलं मत लोकशाही मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही शिस्तीमध्ये वाटचाल करत आहोत. लोकसभा निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेनुरूप लागलेले नाहीत. त्यामुळे आमच्यामधील उणिवा दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्याबरोबरच सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बदण्यात येणार असल्याच्या सुरू असलेल्या चर्चा ह्या चुकीच्या आहेत.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सातत्याने आढावा बैठका घेत आहेत. त्यामध्ये विभागातील सर्व खासदार, आमदार आणि मंत्र्यांना बोलावलं जात आहे. वाराणसी वगळता इतर सर्व विभागांच्या बैठका झाल्या आहेत. आज लखनौ विभागाची आढावा बैठक झाली. मात्र या आढावा बैठकांपैकी प्रयागराजच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे अनुपस्थित राहिले. तर मुरादाबाद विभागाच्या आढावा बैठकीला प्रदेशध्यक्ष भूपेंद्र चौधरी हे अनुपस्थित होते. तर आज झालेल्या लखनौ विभागाच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी दांडी मारली. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या कुठल्याही आढावा बैठकीला उपस्थित राहिलेले नाही. मात्र असं असलं तरी या आढावा बैठकांमधून योगी आदित्यनाथ हे सर्व आमदार, मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींकडून त्यांचं मत जाणून घेत आहेत.