भाजपा खा. बृजभूषण सिंह यांच्या महिला समर्थकांचे अजब विधान; पत्रकारही झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:33 PM2023-06-12T15:33:58+5:302023-06-12T15:34:45+5:30
संपूर्ण गौंडा जिल्ह्यात खासदारांनी कोणत्या महिलेसोबत असे केले नाही. महिला पैलवान जो आरोप लावतायेत तो चुकीचा आहे असं समर्थकांनी म्हणत बृजभूषण सिंह यांचा बचाव केला.
नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीत भारतीय कुश्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुश्तीपटू आंदोलन करत आहेत. आंदोलक खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सरकारला १५ जूनपर्यंत अवधी दिला आहे. परंतु बृजभूषण सिंह त्यांची ताकद पूर्ण पणाला लावून आंदोलकांना उत्तर देत आहेत. त्यात गोंडा येथे भाजपा खासदार बृजभूषण यांच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तेव्हा बृजभूषण समर्थकांनी अजब-गजब तर्क लावत त्यांचा बचाव करताना दिसले.
खासदार बृजभूषण सिंह यांच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांच्या पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतल्या. त्यात एक समर्थक म्हणाला की, जर खासदार महिला प्रेमी असते तर, त्या महिला पैलवानाचे तोंड बघा, त्याहून एकापेक्षा एक सुंदर मुली इथं आहेत. खासदाराला कोणत्या गोष्टीची कमी आहे? असं विचारलं. तर दुसऱ्या महिला समर्थक म्हणाल्या, जर कुणी मुलगा आम्हाला छेडत असेल तर आम्ही त्याला सोडून देऊ? पलटवार करू, त्याला बूट-चप्पलांनी मारू, त्या तर महिला पैलवान आहेत. त्यांना ट्रेनिंग दिले जाते. त्यांनी खासदारांना कसे सोडले? जर त्यांच्यासोबत काही चुकीचे घडले असेल तर त्यांनी तात्काळ निर्णय घ्यायला हवा होता. २-४ वर्षांनी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
इतकेच नाही तर आज खासदारांवर आरोप लावणे हा अन्याय आहे. महिला पैलवानापेक्षा आम्ही बेक्कार आहोत का? आम्हाला अर्ध्या रात्री बोलवू शकत नाही का? आमच्याकडे कुणी पॉवर ऑफ अटॉर्नी नाही, आम्ही त्यांचा विरोध करू शकत नाही. त्यांना आम्हाला रात्री बोलवता येऊ शकत नाही का? असा अजब बचाव महिला समर्थकांनी केला.
दरम्यान, संपूर्ण गौंडा जिल्ह्यात खासदारांनी कोणत्या महिलेसोबत असे केले नाही. महिला पैलवान जो आरोप लावतायेत तो चुकीचा आहे. जर खासदारांविरोधात राजकारण होत असेल तर त्याचे उत्तर मिळेल असंही महिला समर्थकांनी म्हटलं. त्याचसोबत महिला पैलवान आंदोलन करत नाही तर त्यांना तिथे बसवलं गेलंय, विरोधी पक्षांनी योगी-मोदी यांच्या प्रतिमा मलिन करण्यासाठी हा डाव खेळला आहे. खासदारांवर लावलेले आरोप खोटे आहेत असंही खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या समर्थकांनी म्हटलं.