अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसराचे काम वेगात; डिसेंबर २०२५ पर्यंत ७० एकरचा भाग पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 09:51 AM2024-01-08T09:51:02+5:302024-01-08T09:51:52+5:30
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांची माहिती
त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर, परिसर डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्णपणे तयार होईल. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्या मते मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि सुमारे ७० एकर जमिनीवर पसरलेले संपूर्ण संकुल, ज्यात अनेक मंदिरे, रामायण काळातील झाडे, हिरवळ, इतर अनेक संस्था आदींचे बांधकाम २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
- प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सध्या अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. सध्या सुशोभिकरणाच्या कामावर भर देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
- डॉ. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिराचे बांधकाम थांबवण्यात आले असून, गर्भगृहासह संपूर्ण पहिला मजला प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज आहे.
- दुसऱ्या मजल्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, ते अभिषेक समारंभानंतर सुरू करण्यात येणार आहे. तिसऱ्या मजल्याचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यावर भगवा ध्वज फडकणार आहे.
- श्री राम मंदिर बांधकाम समितीची रविवारी बैठक झाली. बैठकीपूर्वी बांधकाम समिती अध्यक्ष निपेंद्र मिश्रा यांनी संपूर्ण संकुलाची फिरून पाहणी केली.
रामजन्मभूमी पथ आणि अनेक ठिकाणी किरकोळ त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मंदिर उभारणीचे काम यशस्वीपणे सुरू असून, त्याबद्दल आपण पूर्णत: समाधानी आहोत. २२ जानेवारीपूर्वी गर्भगृह आणि पहिल्या मजल्याचे १०० टक्के बांधकाम पूर्ण करून ते सुशोभित केले जाईल, असा दावाही त्यांनी केला.