विश्वविक्रमी दीपोत्सव....! २२ लाख दिव्यांनी उजळली अयोध्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 07:09 AM2023-11-12T07:09:58+5:302023-11-12T07:10:09+5:30
लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला.
अयोध्या : अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी घाट परिसरात ‘राम की पौडी’ येथे शनिवारी २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला.
‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या मते एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने दिव्यांच्या रोषणाईचा हा विश्वविक्रम आहे. ड्रोनच्या साहाय्याने या दिव्यांची गणना करण्यात आली. मागच्या वर्षी अयोध्येत १५.७६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.
यापूर्वी प्रतीकात्मक भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर पुष्पक विमानाने अयोध्येत पोहोचले. येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
जगातील १०० हून अधिक देशांमध्ये या दीपोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्रीच्या ‘लाइट ॲण्ड साऊंड’ कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दिवाळीनिमित्त येथे शनिवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत राम कथा उद्यानात पोहाेचली. (वृत्तसंस्था)
कधी करावी पूजा?
रविवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन आहे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करावे. तसेच याच दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी ६ ते रात्री ८:३३ यावेळेत लक्ष्मी-कुबेर पूजन करावे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.