रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 12:08 PM2024-01-09T12:08:57+5:302024-01-09T12:09:35+5:30

अधिवास, जलाधिवास, गंधाधिवास, पुष्प, रत्न अधिवास विधी

Worship of Ramlalla's idol at 'Karmakuti' from 16; Pranapratistha will be held before the ceremony | रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

त्रिगुण नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: रामलल्लाची मूर्ती तयार करण्यात आलेल्या ‘कर्मकुटी’ या ठिकाणी १६ जानेवारीला त्या मूर्तीच्या पूजनास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मूर्तीच्या शिल्पकारांचे प्रायश्चित पूजन होईल, अशी  माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता व धर्माचार्य संपर्कप्रमुख अशोक तिवारी यांनी दिली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी १६ ते २२ जानेवारीदरम्यान चतुर्वेद यज्ञ पार पडणार आहे. २२ जानेवारीला रामलल्लाच्या पुतळ्यावरील पट्टी काढून  आरसा दाखविला जाईल.

१७ जानेवारीला गर्भगृह शुद्धीकरण विधी, १८ जानेवारीला अधिवास, जलाधिवास, गंधाधिवास, १९ रोजी पुष्प व रत्न अधिवास, औषधी व शय्या अधिवास विधी होणार आहे.

मूर्तीची मिरवणूक मंदिर परिसरातच रामलल्लाच्या मूर्तीची संपूर्ण अयोध्यानगरीत व शरयू नदीच्या किनारी मिरवणूक काढली जाईल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ठरविले होते. मात्र, सध्या या शहरात भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने ट्रस्टने आपल्या निर्णयात बदल केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातून मिरवणूक काढणे योग्य नसल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. त्यामुळे आता मिरवणूक मंदिर परिसरातच काढणार आहे.

पंतप्रधानांनी दर्शविली उपवास, व्रताची तयारी

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जर उपवास किंवा व्रत राखायचे असेल तर ते करण्यास मी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केले.

‘सोहळ्याचे पावित्र्य टिकवा’

अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारीला भव्य मंदिरामध्ये प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभर मंगलमय वातावरण ठेवा, कुठेही धांगडधिंगा होता कामा नये, प्रसंगाचे पावित्र्य टिकवा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी सोमवारी केले. एक्सवर एक व्हिडीओ जारी करत त्यांनी रामभक्तांशी संवाद साधला. २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येतील मंदिरात होणार आहे. त्यावेळी देशभरातील मंदिरांमध्ये सगळ्या समाजबांधवांना आमंत्रित करा. भजन-कीर्तन करा. आनंदोत्सव साजरा करा. प्राणप्रतिष्ठेनंतर आरती होईल तेव्हा देशभरातील रामभक्तांनी आपापल्या ठिकाणी आरती करावी. वेगळ्या आरत्यांची गरज नाही, नियमितपणे मंदिरात एरवी होतात त्याच आरत्या कराव्यात. आरतीनंतर प्रसाद वितरण करा. विशिष्ट प्रकारचाच प्रसाद असावा अशी कोणतीही अट नाही, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Worship of Ramlalla's idol at 'Karmakuti' from 16; Pranapratistha will be held before the ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.