अयोध्येत ८ दिवस रामोत्सव; योगी सरकारने सुरू केली तयारी, कसा होणार साजरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 09:40 AM2024-01-05T09:40:29+5:302024-01-05T09:41:06+5:30
Ayodhya Ram Mandir News: सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला हा रामोत्सव कधी सुरू होणार?
Ayodhya Ram Mandir News: २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक गोष्टींना अंतिम स्वरुप देण्यात येत आहेत. वेगाने कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या सोहळ्यासाठी निमंत्रित आहेत. देशभरात राम मंदिर लोकार्पणाचा उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी अयोध्येत रामोत्सव साजरा करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारीपासून अयोध्येत रामोत्सव साजरा केला जाणार आहे. हा रामोत्सव आठ दिवस चालणार आहे. उत्तर प्रदेश राज्यातील सर्व जिल्हे, गावे आणि शहरी भागात हा रामोत्सव साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
रामोत्सवामध्ये कार्यक्रमांची रेलचेल
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामोत्सवात शोभायात्रांसोबतच देशाच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी मंदिरे आणि मठांमध्ये रामकथा प्रवचन आणि रामायणाच्या सुंदरकांडाचे सलग पठण, भजन कीर्तन आयोजित केले जात आहेत. यासंदर्भातील शासन आदेश मुख्य सचिवांनी सर्व जिल्ह्यांना पाठवला असून, त्यामध्ये हे कार्यक्रम भव्य पद्धतीने आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरू असताना भाजपाकडून वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोहळ्यानंतर रामनामातून मतदारांपर्यंत पोहोचत जनसंपर्क करण्याचे भाजपकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून कमीत कमी पाच हजार नागरिकांना अयोध्या मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आले आहेत.