कुणी मुलींची छेड काढली तर चौकात यमराज वाट पाहत असतील, योगी आदित्यनाथ यांचा सक्त इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:36 PM2023-09-18T12:36:16+5:302023-09-18T12:36:59+5:30
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छेडछाड करणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छेडछाड करणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. मानसरोवर रामलीला मैदानात आयोजित समारंभामध्ये ३४३ कोटी रुपयांच्या विकास योजनांचं भूमीपूजन आणि उदघाटन केल्यानंतर सभेला संबोधित करताना योगींनी सांगितले की, कायदा हा संरक्षणासाठी आहे. मात्र कायद्याला बंधक बनवून व्यवस्थेला सुरुंग लावण्याची परवानगी कुणालाही नाही आहे. कायदा हा संरक्षणासाठी आहे. मात्र जर कुणी बहीण-मुलींची छेड काढली तर चौकामध्ये त्या व्यक्तीची वाट यमराज पाहत असतील.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सरकार, विकास, लोककल्याण आणि कुठल्याही भेदभावाविना लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी संकल्पित आणि समर्पित आहे. सरकारबरोबरच जर नागरिकांनीही आपल्या कर्तव्यांचं निर्वहन केलं तर विकासकार्यांमध्ये अडथळे आणणारे उघडे पडतील. विकास योजनांमध्ये अडथळे आणणाऱ्यांना उघडे पाडण्याचं काम सरकारही वेगाने करत आहे.
विकासकामांना सरकारच्या प्राधान्यक्रमांमध्ये अग्रस्थान देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, विकासकामांमध्ये कुठल्याही स्तरावर बेफिकीरी होता कामा नये. कुठलीही कार्यकारी संस्था असू दे, तिला मानक आणि गुणवत्तेसह विकासकार्य करण्यासाठी कटीबद्ध व्हावं लागेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांनी सांगितलं की, आज विकास हीच गोरखपूर आणि उत्तर प्रदेशची ओळख बनली आहे.
ते पुढे म्हणाले की, सहा वर्षांपूर्वी राज्यात गोरखपूर आणि देशात उत्तर प्रदेशबाबत लोकांचं मत काय होतं, ओखळ काय होती, विकासाची काय परिस्थिती होती, हे सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेश आणि गोरखपूरने विकासाबाबत आपली नवी ओळख बनवली आहे. आज उत्तर प्रदेशची ओळख देशामध्ये विकास सुशासन आणि उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आहे. येथील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या विकास योजना पूर्ण होत आहेत.