योगींची मोठी चाल, केशव प्रसाद मौर्य यांना पराभूत करणाऱ्या पल्लवी पटेल यांची घेतली भेट, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:08 PM2024-07-25T22:08:00+5:302024-07-25T22:08:59+5:30
Uttar Pradesh Political Update: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सत्ताधारी भाजपामध्ये शह काटशहाचा खेळ सुरू आहे. नव्या घडामोडींमध्ये समाजवादी पक्षाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सत्ताधारी भाजपामध्ये शह काटशहाचा खेळ सुरू आहे. नव्या घडामोडींमध्ये समाजवादी पक्षाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. पल्लवी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येत योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पल्लवी पटेल यांनी केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी पटेल यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटांपर्यंत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पल्लवी पटेल यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सिराथू विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला होता. पल्लवी पटेल ह्या अपना दल सोनेलाल पक्षाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांच्या भगिनी आहेत. वडील सोनेलाल पटेल यांच्या राजकीय वारशावरून झालेल्या वादानंतर पल्लवी पटेल यांनी अपना दल कमेरावादी हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता.
पल्लवी पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घेतलेल्या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पल्लवी पटेल आणि अनुप्रिया पटेल यांच्यामध्ये राजकीय आणि कौटुंबिक वाद आहे. तर अनुप्रिया पटेल ह्या मागच्या काही दिवसांपासून योगी आदित्यनाथ यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तर केशव प्रसाद मौर्य हे मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये संघटना विरुद्ध सरकार असा वाद लावून योगींना आव्हान देत आहेत.
दरम्यान, २०२२ मध्ये पल्लवी पटेल यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून पल्लवी पटेल आणि अखिलेश यादव यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये पल्लवी पटेल ह्या असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत पीडीएम आघाडी करून लढल्या होत्या. मात्र त्यांना यश मिळालं नव्हतं.