तुझं माझं जमेना... राणीने राजावर केले गंभीर आरोप, पण घटस्फोट देण्यास नकार, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:53 PM2023-08-29T13:53:58+5:302023-08-29T13:54:52+5:30
Raja Bhaiya & Bhanvi Singh Relationship: राजा भैया आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्या नात्यात दुरावा आला असून, त्यांच्या घटस्फोटाबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता एक अजब वळण लागलं आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बाहुबली चेहरा असलेले रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया सध्या त्यांच्या कौटुंबिक जीवनातील घडामोडींमुळे चर्चेत आहेत. राजा भैया आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्या नात्यात दुरावा आला असून, त्यांच्या घटस्फोटाबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता एक अजब वळण लागलं आहे.
उत्तर प्रदेशमधील कुंडा मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिलेल्या राजा भैया यांच्यावर त्यांची पत्नी भानवी सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. तसेच नेमकं कोण आहे ज्याच्यामुळे या राजा आणि राणीमध्ये वाद झालाय. तसेच एवढे गंभीर आरोप केल्यानंतरही भानवी सिंह यांनी राजा भैय्या यांना घटस्फोट देण्यास का नकार दिलाय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सध्या कोर्टामध्ये आहे. हल्लीच भानवी यांनी घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये दिल्लीच्या साकेत कोर्टामध्ये शपथपत्र दाखल केलं. यामध्ये त्यांनी पती राजा भैय्यावर शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यासह एका महिला पत्रकारासोबत त्यांचं अफेअर सुरू असल्याचाही आरोप केला होता.
दरम्यान, भानवी सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझे पती राजा भैय्या यांनी एका महिला पत्रकारासोबत असलेल्या अफेअरमुळे मला घराबाहेर काढले. एवढंच नाही तर परत सासरी येऊ दिलं नाही. मात्र ते माझे पती आहेत आणि ते माझ्या मुलांचे पिता आहेत. मी त्यांना घटस्फोट देऊ इच्छित नाही. मी त्यांना कधीच घटस्फोट देणार नाही. माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी मी शक्यतोपरी प्रयत्न करीन.
भानवी सिंह यांनी पुढे सांगितले की, राजा भैय्या यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. पण मी माझं घर का सोडू. तिथे येऊन कुणी अन्य व्यक्ती राहावी, याची मी घटस्फोट का देऊ. मी घटस्फोट देणार नाही. दरम्यान, राजा भैय्या यांच्या घटस्फोट प्रकरणी पुढील सुनावणी ही १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आता भानवी या घटस्फोट देण्यास तयार नसल्यावरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. कुणी हा नाते टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणत आहे. तर कुणी वाद सोडवण्याचा प्रयत्न आहे, असं सांगत आहे. मात्र यामागे नेमकं खरं कारण काय हे भानवी सिंहच सांगू शकतात.