तरुण, तरुणी आणि जोडपी, फ्लॅटमधून येत होते अजब आवाज, आतलं दृश्य पाहून पोलीसही अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 03:57 PM2024-08-10T15:57:08+5:302024-08-10T15:57:29+5:30
Rave Party in NOIDA: सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून एका फ्लॅटमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस त्वरित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून आतील परिस्थिती पाहिली, तेव्हा तेसुद्धा अवाक झाले.
नोएडामधील सेक्टर ९४ मधील पॉश परिसरात असलेल्या सुपरनोव्हा सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई केली. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी जेव्हा फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी या फ्लॅटमधून २० हून अधिक तरुण तरुणींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून एका फ्लॅटमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस त्वरित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून आतील परिस्थिती पाहिली, तेव्हा तेसुद्धा अवाक झाले. फ्लॅटमध्ये काही विद्यार्थी विद्यार्थिनी बेधुंद होऊन मद्यपान करत होते. फ्लॅटमध्ये चहुबाजूला दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. पकडण्यात आलेल्या अनेक तरुण तरुणींचं वय हे २१ वर्षांहून कमी असल्याची माहिती समोर येत आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या तरुण तरुणींनी दिलेल्या माहितीमधून येथे शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांनी रेव्ह पार्टीचं आयोजन केलं होतं. सुपरनोव्हा सोसायटीमधील रहिवाशांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी या विद्यार्थी तरुण तरुणींना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी रहिवाशांसोबत गैरवर्तन केलं. काहींनी बाल्कनीमधून दारूच्या बाटल्यासुद्धा खाली फेकल्या.यादरम्यान, तिथे मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती. अखेर त्रस्त झालेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलीस तिथे आले. पोलिसांना दरवाजा उघडून आत पाहिलं असता तिथे काही तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत सापडले.
पोलिसांनी या कारवाईनंतर सांगितले की, या रेव्ह पार्टीचं निमंत्रण हे व्हॉट्सअँपवरून पाठवण्यात आलं होतं. त्यात लिहिलं होतं की, एक धमाकेदार हाऊस पार्टी होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता घरी या. निमंत्रणासोबत प्रवेश फीसुद्धा नमुद करण्यात आली होती. त्यामध्ये मुलींसाठी ५०० रुपये, कपल्ससाठी ८०० रुपये आणि तरुणांसाठी १ हजार रुपये असा दर ठेवण्यात आला होता. आता या प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.