आता बस करा; आमची मात्र जिरली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 05:00 AM2022-07-15T05:00:00+5:302022-07-15T05:00:16+5:30
सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांनी ‘येरे... येरे... पावसा’ अशी गळ घालत गावागावात धोंडी काढली होती. ‘धोंडी... धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे...’ अशी विनवणी करीत पंगतीही उठविण्यात आल्या. पण, आता गेल्या आठवड्यापासून या पावसाने चांगलाच कहर केल्याने आता ‘जारे... जारे... पावसा’ म्हणण्याची वेळ आली. सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे.
जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. अजूनही हवामान खात्याच्या वतीने अतिपावसाची शक्यता वर्तविली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील पाण्याचीही पातळी वाढली असून निम्न वर्धा प्रकल्पाचे ११ दरवाजे ६० सेंमीने तर लाल नाला प्रकल्पाचे २ दरवाजे ५ सेंमीने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिकडे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यात असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अद्यापही आकाशात ढगांची गर्दी कायम असल्याने आता हा पाऊस अनेकांना नकोसा झाला आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेत शिवारातील पाण्यामुळे पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून ओला दुष्काळ जाहीर करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.