5,016 करदात्या शेतकऱ्यांकडून वसूल झाली 1 कोटी 36 हजारांची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:00 AM2021-05-29T05:00:00+5:302021-05-29T05:00:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. ...

1 crore 36 thousand was recovered from 5,016 taxpayer farmers | 5,016 करदात्या शेतकऱ्यांकडून वसूल झाली 1 कोटी 36 हजारांची रक्कम

5,016 करदात्या शेतकऱ्यांकडून वसूल झाली 1 कोटी 36 हजारांची रक्कम

Next
ठळक मुद्देपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा मिळाला होता लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. या योजनेचा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना लाभही मिळाला. पण त्यापैकी तब्बल १६ हजार ८८० शेतकरी करदाते असल्याचे पुढे येताच जिल्ह्यात धडक मोहीम राबवून शासकीय निधी परत गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार १६ करदात्या शेतकऱ्यांकडून १ कोटी ३६ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून शासकीय योजनेची ही रक्कम वसूल करण्याचे काम गाव पातळीवर तहसीलदारांच्या माध्यमातून केले जात आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेले तसेच करदाते शेतकरी याची शहानिशा जिल्हा प्रशासनाने केली असता तब्बल १६ हजार ८८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम वळती झाल्याचे पुढे आले. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. तालुका स्तरावर या मोहिमेचे नेतृत्व तालुका न्यायदंडाधिकारी तसेच तहसीलदार करीत असून आतापर्यंत ५ हजार १६ करदात्या शेतकऱ्यांकडून १ कोटी ३६ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ मिळालेल्या उर्वरित करदात्या शेतकऱ्यांकडून शासकीय निधी कसा परत मिळविता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या मोहिमेत कारंजा तालुका पुढे असून वर्धा तालुक्यात केवळ ३.६२ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे वाढता कोविड संसर्गामुळे काही प्रमाणात या मोहिमेला ब्रेक लागला आहे. पण त्यावरही वेळीच मात करून नोटीस बजावण्यात आलेल्या व पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडून वेळीच शासकीय निधी कसा परत मिळेल यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले.
 

जूनच्या आत करावे लागणार पैसे परत
तब्बल दहा हजारांहून अधिक करदात्या शेतकऱ्यांकडून अजूनही शासकीय निधी वसूल करणे शिल्लक आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. नोटीसची दखल घेत आतापर्यंत ५ हजार १६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ हजारांची रक्कम परत केली आहे. पण अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे शासकीय निधी थकला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत शासकीय निधीची रक्कम परत न केल्यास बेकायदा पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर कारणांनी ९९४ शेतकऱ्यांना ठरविले अपात्र
हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित करून त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. पण इतर कारणांनी ९९४ शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

माझे घोराड येथे शेत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी कुठलाही अर्ज न करता बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली होती. आपण आयकर भरणारे असल्याने सदर रक्कम तलाठ्याकडे दिली आहे. त्याची पावतीही मला देण्यात आली आहे.
- सुरज वरडकर, शेतकरी, घोराड.

मी शेतकरी आणि शिक्षक आहे. माझ्या खात्यावर तीन टप्प्यात सहा हजार रुपये जमा झाले. मी आयकर भरतो. त्यामुळे प्रशासनाने पैसे परत करण्यासंदर्भात नोटीस पाठविली होती. आपण तलाठ्याकडे पैसे परत करीत पावती केली. पण आता पुन्हा दोन हजार रुपये बँक खात्यात आले आहे. हा घोळ थांबविण्याची गरज आहे.
- प्रशांत येळणे, शेतकरी, सिंदी (रेल्वे).
 

आतापर्यंत नियमितपणे प्रत्येक टप्प्याचे दोन हजार रुपये जमा झाले. १४ मे रोजी घोषणा होऊनही बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. पीएम किसान योजनेच्या लाभापासून आम्ही वंचित राहिलो आहे. तहसील कार्यालयात चौकशी केली असता कृषी विभागाकडे विचारणा करा असे सांगण्यात आले. तर कृषी विभागाने तहसीलमध्येच विचारणा करा असे सांगितल्याने अडचणीत भर पडली आहे.
- वसंत सिरसे, शेतकरी, सिंदी (रेल्वे).
 

 

Web Title: 1 crore 36 thousand was recovered from 5,016 taxpayer farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.