पवनार, केळझर व बोरच्या विकासाकरिता १० कोटी
By admin | Published: April 11, 2017 01:15 AM2017-04-11T01:15:57+5:302017-04-11T01:15:57+5:30
वर्धा विधानसभा क्षेत्रातील केळझर, पवनार या गावांना प्राचीन इतिहास आहे. तसेच वाघांचे सुरक्षित स्थळ म्हणून बोर व्याघ्र प्रकल्प नावारुपास येत आहे.
पंकज भोयर यांची माहिती : केळझरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मभूमीतही होणार सुविधा
वर्धा : वर्धा विधानसभा क्षेत्रातील केळझर, पवनार या गावांना प्राचीन इतिहास आहे. तसेच वाघांचे सुरक्षित स्थळ म्हणून बोर व्याघ्र प्रकल्प नावारुपास येत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तीनही ठिकाणाचा विकास करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. या पर्यटन स्थळांचा विकास करण्याकरिता प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत या गावांच्या विकासासाठी १० कोटी २९ लक्ष ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
एक चक्राकारनगरी म्हणजे केळझर गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा दत्तक घेतले आहे. यामुळेच गावाच्या विकासासाठी ४ कोटी ९५ लक्ष १९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी अंतर्गत सिध्दीविनायक मंदिर परिसरात पर्यटकांकरिता सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी १ कोटी ९२ लक्ष ३२ हजार रुपये खर्च केल्या जाणार आहे. केळझर येथील हजरत पीर बाबा टेकडीचा विकास व पर्यटन सुविधा यासाठी १ कोटी ४१ लक्ष ९४ हजार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मभूमी परिसरात सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी १ कोटी ३७ लक्ष ३६ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. सल्लागार वास्तुविशारद व आकस्मिक निधी म्हणून २३ लक्ष ५७ हजार रुपयांचा निधी सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
बोरधरण येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ३ कोटी ८९ लक्ष ८२ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये बोरधरण परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत बोटिंग, हेल्थ क्लब अन्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. या निधीमुळे या तीन्ही गावांचा विकास होणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)
पवनार नदीघाटाकरिता १.३३ कोटी
पवनार येथील विकासासाठी १ कोटी ३६ लक्ष ७५ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. या निधी अंतर्गत पवनार येथील नदी घाट परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी ५८.५४ लक्ष रुपये, नदी घाटावर क्रॉक्रींट स्टेप्सच्या बांधकामाकरिता ३३ कोटी १० हजार व नदीघाटावर लॅन्ड स्केपिंग करण्यासाठी ४५ लक्ष ११ हजार रूपये खर्च केला जाणार आहे.