१० रुपयांत मिळणार पोटभर जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:42 PM2018-03-24T21:42:18+5:302018-03-24T21:42:18+5:30
महागाईच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता दोन वेळचे जेवण मिळविणे तसेही कठीणचं. अशा व यासारख्या अनेक नागरिकांना कमी पैशात जेवण उपलब्ध करून देण्याचा मानस वर्धेच्या नगराध्यक्षांचा आहे.
रूपेश खैरी ।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : महागाईच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता दोन वेळचे जेवण मिळविणे तसेही कठीणचं. अशा व यासारख्या अनेक नागरिकांना कमी पैशात जेवण उपलब्ध करून देण्याचा मानस वर्धेच्या नगराध्यक्षांचा आहे. त्यांनी १० रुपयांत जेवण देणारी रसोई निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्सम प्रस्ताव नगर परिषदेच्या सभेत सादर करण्यात येणार असून एकहाती सत्ता असलेल्या पालिकेत तो नाकारला जाणार नाही, अशी त्यांची अपेक्षा आहे.
सर्वसामान्यांना पोटभर जेवण देण्याकरिता कार्यरत असलेली ही रसोई नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या नावावर निर्माण झालेल्या खंडरात सुरू होणार आहे. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कल्पनेतील या रसोईला प्रारंभी ११ महिने सांभाळण्याकरिता एका संस्थेकडून होकार आला आहे. यामुळेच ही कल्पनेतील रसोई वास्तवात उतरणार असल्याचे चित्र आहे. असे झाल्यास मुंबईतील आमदार निवासातील खाणावळीनंतर कमी पैशात जेवण देणारी वर्धेतील रसोई एकमेव ठरणार आहे.
नगराध्यक्षांकडून या रसोईचा प्रस्ताव रामनवमीनंतर पालिकेच्या सभागृहात येणार आहे. येथून प्रस्तावावर एकमत होताच कामाला प्रारंभ होणार आहे. महिनाभरात पालिकेची ही रसोई सर्वसामान्यांना कमी पैशात पोटभर जेवण देण्याकरिता तयार होणार आहे. या रसोईतून पालिकेच्या तिजोरीवर कोणताही भुुर्दंड बसणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. उलट यातून काही ना काही प्रमाणात पालिकेला लाभ होणार आहे. ही रसोई निर्माण होताच शहरात असलेल्या या खंडरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल आणि सर्वसामान्यांना कमी पैशात जेवणही उपलब्ध होणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिरणार रसोईची गाडी
वर्धा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून अनेकजण शासकीय कामाकरिता येतात. या कामाला येताना लागणाऱ्या तिकिटात आणि शासकीय कार्यालयात अलिखित नियमामुळे पैसे देण्याच्या प्रकारामुळे त्यांच्या खिशात महागड्या हॉटेलात जाऊन नाश्ता करण्याची त्यांची सोय नसते. अशांना अत्यल्प दरात जेवण देण्याचे काम या रसोईकडून होणार आहे.
रसोईची ही गाडी शहरातील रेल्वे, बसस्थानक, शासकीय कार्यालय यासह आसपासच्या परिसरात फिरणार आहे. येथेही नागरिकांना रसोईचा लाभ मिळणार आहे.
खंडराची समस्या निकाली निघेल
वर्धा शहरात ठाकरे मार्केट परिसरात असलेल्या मैदानात सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार कामाचा शुभारंभ झाला. कामही सुरू झाले. मोठी रक्कम खर्च झाली; पण सभागृहाची इमारत पूर्णत्त्वास गेली नाही. परिणामी, शहराच्या मध्यभागी एक खंडर निर्माण झाले. येथे कमालीची अस्वच्छता पसरली असून त्याचा त्रास परिसरात असलेल्या शाळांनाही होत आहे. या खंडरात जर ही रसोई निर्माण झाली तर खंडराचीही समस्या मार्गी लागणार आहे.
नागरिकांना १० रुपयांत पोटभर जेवण देण्याकरिता रसोई सुरू करण्याची संकल्पना आहे. यात पालिकेच्या तिजोरीवर कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही. उलट त्यातून निधी संकलीत होणार आहे. या रसोईचा पहिला ११ महिन्यांचा भार उचलण्याकरिता एक सामाजिक संस्था तयार आहे. हा प्रस्ताव लवकरच पालिकेच्या सभागृहात ठेवण्यात येणार आहे. तो मंजूर होण्याची अपेक्षा आहे. मंजुरी मिळताच एका महिन्यात या रसोईतून जेवण मिळेल, असे अपेक्षित आहे.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.