दारू व्यवसायात गुंतले १० हजार हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:15 AM2019-01-02T00:15:40+5:302019-01-02T00:16:05+5:30

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. कुठेही बंदी असल्याचे दिसत नाही. २५० ते ३०० लोकसंख्येच्या गावातही अवैध दारूचे गुत्थे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे दैनंदिन सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे.

10 thousand hands engaged in liquor business | दारू व्यवसायात गुंतले १० हजार हात

दारू व्यवसायात गुंतले १० हजार हात

Next
ठळक मुद्देबंदीच्या जिल्ह्यातील वास्तव : अल्पवयीनांपासून वृद्ध, महिलाही सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. कुठेही बंदी असल्याचे दिसत नाही. २५० ते ३०० लोकसंख्येच्या गावातही अवैध दारूचे गुत्थे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे दैनंदिन सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. या अवैध दारू व्यवसायात १० हजारांहून अधिक लोक सहभागी असल्याचे दिसून येत आहे.
अल्प श्रमात मोठा मोबदला मिळत असल्याने बालकांपासून ते वृद्धांपर्यंत व महिलाही या व्यवसायात गुंतल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात शासनाने दारूबंदी केली आहे. व त्याची अंमलबजावणी पोलीस, उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे सोपविली आहे. परंतु जिल्ह्यात कुठेही अवैध दारू व्यावसायिंकावर कठोर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे दारूचा कुटीरउद्योग गावागावांत बहरला आहे. शेतीला मजूर मिळणे कठीण असताना या अवैध व्यवसायासाठी हजारो हात तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांची कारवाई केवळ फोटो काढण्यापुरतीच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्व नद्यांच्या काठावर मोहा दारूच्या हातभट्ट्या राजरोसपणे सुरू आहेत. एका पोलीस ठाण्याला किमान महिन्याला ५ ते ७ लाख रुपये या अवैध व्यवसायातून मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात सेवाग्राम, पवनार ही दोन मोठी व ऐतिहासिक गावे आहेत. येथेही अवैधरीत्या दारू विकली जाते. नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या बोरधरणपासून ते वर्धेपर्यंत सर्वत्र अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट झाला आहे. काही गावात महिलांनी या दारूविक्रीला विरोध केला असला तरी त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने दारूचा अवैध व्यापार वाढत चालला आहे. जिल्ह्यात येत असलेली विदेशी दारू बनावट स्वरूपाची असून यामुळे अनेक भागांत नियमित सेवन करणाऱ्यांना पोटाचे विकार जडले आहे. जिल्ह्यातील १०० मृत्यूमागे किमान ५० मृत्यू हे दारूच्या सेवनाने होत असल्याचा निष्कर्ष यासंदर्भात अभ्यास करणाºया संस्थांनी मांडला आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येते.
बाहेर जिल्ह्यातून येतो दारूसाठा
वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, अमरावती हे जिल्हे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी केली आहे. उर्वरित जिल्ह्यात दारू खुली असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी केली जाते. काही दिवंसापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याला दारूची तस्करी करताना वर्धा पोलिसांनी अटक केली होती. बरेचवेळा महिला या बसगाड्यांमधूनच दारूची वाहतूक करतात. अत्यल्प कष्टात लाखो रुपये महिन्याला कमावून देणाऱ्या दारूच्या व्यवसायात अनेकांनी आपले संपूर्ण कुटुंब उतरविले आहे. अलिशान गाड्यांमधून दारूची वाहतूक केली जाते. वर्धा शहरालगत असलेल्या सर्वच ढाब्यांवर ग्राहकांना दारू उपलब्ध करून दिली जाते नव्हे, तर अनेकांनी अशा ग्राहकांसाठी हॉटेलच्या पाठीमागे टिनाचे शेड उभे करून तेथे दारूविक्री चालविली आहे. यामुळे दारूचा व्यापार कोटींच्या घरात आहे.

लोकप्रतिनिधींचे मौन
वर्धा हा राज्यातील पहिला दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र, येथील दारूबंदी पूर्णपणे फसली, हे सांगण्याचे धाडस या जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीमध्ये नाही. दिवंगत आमदार प्रमोद शेंडे यांनी विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर असताना नागपूर अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याचे धाडस केले होते. अलीकडे जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने दारूच्या विषयावर साधे भाष्यही केलेले नाही. दोन दिवसांपूर्वी खासदार तडस यांनी देवळी येथे ठाणेदारांना दारूविक्रेत्यांची धिंड काढा, असे सांगून आपला संताप व्यक्त केला.

Web Title: 10 thousand hands engaged in liquor business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.