10 वर्षीय चार्वीने केला श्लोकांचा हिंदी अनुवाद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:49 AM2024-01-20T11:49:22+5:302024-01-20T11:52:26+5:30
संस्कृत श्लोकांच्या उच्चारासाठी अमृता खंडेराव यांनी मार्गदर्शन केले.
वर्धा : शहरातील पाचव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दहावर्षीय चार्वीने जल-जमीन आणि वायुप्रदूषण यांवरील संस्कृतमधील एकूण ५२ श्लोकांचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली असून, यवतमाळ येथील बोधिसत्त्व खंडेराव यांच्या ‘पर्यावरण श्लोकमाला’ या पहिल्या पुस्तकात या श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. चार्वी सचिन गरपाळ, असे या मुलीचे नाव आहे.
पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश
वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या मार्गदर्शनात चार्वीने ऑक्सिजन पार्क हनुमान टेकडीवर झाडे लावून त्याचे संगोपन कसे करायचे, हे शिकून पर्यावरण विषयाला ‘पर्यावरण श्लोकमाला’ या शृंखलेद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ती नृत्य, गायन, खेळ, योगाभ्यास, जिम्नॅस्टिक, नाट्यकला अशा विषयांत पारंगत आहे. संस्कृत श्लोकांच्या उच्चारासाठी अमृता खंडेराव यांनी मार्गदर्शन केले.
श्लोकाचे ५२ व्हिडीओ तयार
‘पर्यावरण श्लोकमाला’ या पुस्तकातील सर्व श्लोकांचे चार्वी गरपाळ हिने ५२ व्हिडीओ तयार केले आणि बोधिसत्त्व खंडेराव ‘युट्यूब’वर अपलोड केले. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलच्या ‘वन फॉर चेंज-२०२३’ या लोकप्रिय मालिकेत बोधिसत्त्वच्या लघुपटामध्ये चार्वीने काम केले आहे.