वर्धा जिल्हा हादरला; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:26 AM2023-01-10T11:26:03+5:302023-01-10T11:28:09+5:30
अल्पवयीन तिघांना घेतले ताब्यात : शहरात खळबळ
वर्धा : एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. तर दुसरीकडे महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. अशीच संतापजनक घटना सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अवघ्या १० वर्षीय मुलीला तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी तलावाकडे खेचत नेत झुडपात तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सावंगी पोलिसांना ही घटना कळताच त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. पोलिसांनी तिन्ही विधी संघर्षित मुलांना ताब्यात घेतले असून बाल न्याय मंडळापुढे हजर करणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी सांगितले.
सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडिता ही घरासमोरील अंगणात खेळत असताना तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी तिला बळजबरीने घरामागे असलेल्या तलावाकडे खेचत नेले. तेथील झुडपांत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी थेट सावंगी पोलिस ठाणे गाठून याबाबतची माहिती दिली. दरम्यान पोलिस ठाण्यात हजर कर्मचाऱ्यांच्याही पायाखालची वाळू सरकली.
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही विधी संघर्षित बालकांविरुद्ध कलम ३६३,३७६, (एबी),३७६(२)(एन),३७६ (ड) भादंवि सहकलम ४,६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली. या घटनेने वर्धा जिल्हा चांगलाच हादरला आहे.