१०० किलो प्लॉस्टीक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:43 PM2018-02-09T23:43:48+5:302018-02-09T23:44:08+5:30
प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल १०० किलो प्लास्टिक जप्त करीत दंडाची वसुली केली आहे.
येत्या गुढीपाडव्यापर्यंत राज्य प्लास्टीकमुक्त करण्याचे शासनाने ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाप्रमाणे नगर पंचायत क्षेत्रातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक जप्तीची धडक कार्यवाही करण्यात येत आहे. सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ५० व्यावसायिक प्रतिष्ठान व दुकानदार टाकलेल्या धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक जप्त करून प्रति व्यावसायिक १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सेलू नगर पंचायतीचे कार्यालय अधीक्षक दिनेश बुधे, प्रशांत रहांगले, नारायण दांडेकर, प्रभाकर करनाके, अक्षय निमजे, सुधाकर भलावी, आशिष ढोबळे, रामाजी मुळे या प्लास्टीक जप्ती पथकाने आतापर्यंत चहा ग्लास, प्लास्टीक वाटी, पाण्याचे ग्लास, प्लास्टीक पिशव्या अशा प्रकारचे साहित्य जप्त करून दंडात्मक कार्यवाही केली.
हिंगणघाटात जप्ती मोहीम
ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम राबविल्या जात आहे. याच मोहिमेत कमी माईक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा, यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात आरोग्यास अपायकारक प्लास्टीक वापर होत असल्याचे दिसून आले. नगर पालिकेच्या चमूने केवळ दोनच दिवसात ३४ दुकानातून ५० किलो. कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक दंडासह जप्त केले.
शहरात नगर परिषदेच्यावतीने कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक पिशव्या जप्तीची कारवाई सुरू असून विविध व्यावसायिकांकडून २० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून दंडही वसूल करण्यात आला.
सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ हिंगणघाट सुंदर हिंगणघाट या मोहिमेला गती देण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई आता सकाळी व संध्याकाळी असा दोन वेळेला करीत आहे. कधी कधी तिसऱ्यांना अर्थात दुपारीही केल्या जात असून स्वच्छतेकडे अधिक लक्ष घातल्या जात आहे. ओल्या आणि सुका कचऱ्यांकरिता चौकाचौकात कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार नगर परिषदेनेही मोहीम आखली असून शाळा शाळातून अशा जागृती मोहिमेवर बळ दिल्या जात आहे. विद्यार्थ्यांची रॅली, मेळावे काढून सक्रीय होण्यासाठी पालिका प्रयत्नशिल असून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. स्वच्छ शहराकरिता प्लास्टीक निर्मूलनाची गरज असून मोठ्या प्रमाणात हाच कचरा जास्त धोक्याचा असल्याचे दिसून आले आहे.