जिल्ह्यातील दहा जलाशयात शतप्रतिशत साठा; सात जलाशये ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:48 PM2024-10-11T17:48:07+5:302024-10-11T17:49:56+5:30

सात जलाशय ओव्हरफ्लो : निम्न वर्धा प्रकल्पातून विसर्ग सुरू

100% stock in ten reservoirs of the district; Seven reservoirs overflow | जिल्ह्यातील दहा जलाशयात शतप्रतिशत साठा; सात जलाशये ओव्हरफ्लो

100% stock in ten reservoirs of the district; Seven reservoirs overflow

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाले. असे असले तरी त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतली नाही. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने लहान-मोठी सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाची दहा जलाशये शत प्रतिशत भरली असून, सात जलाशये ओव्हरफ्लो झाली आहे. तर दोन जलाशयांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्पांतील जलणीसाठा समाधानकारक आहे. गट महिन्यात संततधार झालेल्या पावसांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असले तरी जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीपातळीत भरघोस वाढ झाली आहे. जिल्ह्यात लहान मोठे, असे एकूण ११ जलाशय आहे. या जलाशयांतून वर्धा ग्रामीण भागासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांना उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील निम्न वर्धा, धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प मदन उन्नई धरण, नाल नाला, कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत.


जिल्ह्यातील जलाशयाची पाणीपातळी ९८. ५५ टक्के अशी आहे. अशातच आता परतीच्या पावसानेही चांगलेच झोडपून काढले आहे. अजुनही ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता नाकारता येत नाही. या परतीच्या पावसामुळे जलाशयांची पाणीपातळी आणखी वाढणार आहेत. परिणामी उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे. शेतकऱ्यांना खरिपांत नुकसानीचा सामना करावा लागला तरी रब्बीत आधार मिळणार आहे. 


निम्न वर्धाच्या तीन दारांतून विसर्ग
वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू आहे. त्या अनुषंगाने निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी निम्न वर्धा धरणाचे तीन दरवाजे १५ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. यातून ४३.०९ दलघमी पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात होत आहे. 


उशिराने बरसला पण, हाहाकार माजविला...
जिल्ह्यात वरुणराजा उशिराने बरसला पण, चांगलाच हाहाकार माजविला. यामुळे वर्ध्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरुन पाणी वाहत असताना काहींना जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्यात. 


जिल्ह्यातील जलाशयाची पाणीपातळी (दलघमीमध्ये)
बोर प्रकल्प - १३४. ५४ 
निम्न वर्धा - २५३. ३४ 
धान प्रकल्प - ६९. ४३५ 
पंचधारा प्रकल्प - ९. ६८० 
डोंगरगाव प्रकल्प - ४. ८१० 
मदन प्रकल्प - ११. ४६०
मदन उन्नई - ३. ७२० 
लाल नाला - २९. ५१५ 
वर्धा कार नदी - २५. ९६२ 
सुकळी लघु - ११. ९२० 
पोथरा - ३८. ४२० 
 

Web Title: 100% stock in ten reservoirs of the district; Seven reservoirs overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा