संकरीत कपाशीची हवी १०.१८ लाख पाकिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:14 AM2018-05-08T00:14:27+5:302018-05-08T00:14:27+5:30
गत खरीपात कपाशीवर आलेल्या बोंड अळीमुळे यंदाच्या हंगामात कपाशीचा पेरा घटणार असे बोलले जात आहे. असे असताना जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या हंगामात २ लाख २५ हजार ३६३ हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार असल्याचे नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत खरीपात कपाशीवर आलेल्या बोंड अळीमुळे यंदाच्या हंगामात कपाशीचा पेरा घटणार असे बोलले जात आहे. असे असताना जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या हंगामात २ लाख २५ हजार ३६३ हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार असल्याचे नियोजन केले आहे. एवढ्या हेक्टरवर कपाशीचे नियोजन असल्याने त्याच्या पूर्ततेकरिता जिल्ह्याला संकरीत कपाशीच्या बियाण्यांची ४ हजार ५८४ क्विंटल म्हणजेच १० लाख १८ हजार पाकिटांची गरज आहे. असे असताना मे महिन्यात कपाशीच्या एका अधिकृत कंपनीच्यास बियाण्यांचे एकही पाकिट नसल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात कपाशीची अधिकृत बियाणे आली नसली तरी मध्यप्रदेशातील अनधिकृत बियाणे आल्याचे कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. आतापर्यंत बोगस बीटी बियाण्यांचा व्यापार करणाऱ्या तिघांवर कृषी विभागाच्यावतीने कार्यवाही करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात बियाणे जप्त करण्यात आले आहेत. संकरीत कपाशीची अधिकृत बियाणे जिल्ह्यात येण्याकरिता अजून १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची शंका कृषी विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
यंदाच्या खरीपात जिल्ह्यात ४ लाख १५ हजार ७३८ हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यात सर्वाधिक पेरा कपाशीचा असून सोयाबीन १ लाख १७ हजार हेक्टरवर पेरले जाणार असल्याचे नियोजन आराखडा सांगत आहे. तर यंदा तुरीचा पेरा ६९ हजार ५०० हेक्टरवर होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ११०० हेक्टरवर संकरीत ज्चारी, ६७५ हेक्टरवर भुईमुंग, ४०० हेक्टरवर मुंगाचा पेरा होणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण नियोजनाच्या पूर्ततेकरिता जिल्ह्यात तब्बल ६६ हजार २२२ क्विंटल बियाण्यांची गरज वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या बियाण्यांची गरज शासकीय यंत्रणा म्हणून महाबीजसह इतर कंपन्या करणार आहे. तर अनेक खासगी कंपन्यांची बियाणेही बाजारात येत आहेत. त्यांच्याकडून बियाण्यांची ही पूर्तता होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सध्या शेतकºयांची उन्हाळवाहीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यातही हवामान खात्याने यंदाच्या पावसाळ्यात वेळेवर पाऊस येणार असल्याचे भाकीत केले आहे. मान्सून सुरू होण्याकरिता केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. असे असताना महाबीजच्यावतीने कुठलेही बियाणे जिल्ह्यात दाखल झाले नाही. शिवाय त्यांच्याकडून केव्हा बियाणे पुरविण्यात येतील याचेही नियोजन कळविण्यात आले नाही. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना खासगी बियाण्यांवरच अवलंबून राहण्याची वेळ येण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसते.
शिवाय शासनाच्या मोफत बियाणे योजनांनाही महाबीजकडून किती बियाणे पुरविण्यात येणार आहे, याची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. यामुळे यंदा शासनाच्या योजनेलाही हरताळ फासल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बियाणे पुरवठ्याकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संकरीत कपाशीच्या अधिकृत बियाण्यांकरिता प्रतीक्षाच
जिल्ह्यात कपाशीची बोगस बीटी बियाणे आल्याचे समोर आले आहे. यापासून शेतकऱ्यांना सावधान राहण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अधिकृत संकरीत कपाशीची बियाणे बाजारातून १५ मे नंतर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कापूस उत्पादकांना प्रमाणित बियाण्यांकरिता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
महाबीज पुरविणार सायोबीनचे केवळ २० हजार क्विंटल बियाणे
बियाण्यांकरिता शासनाची अधिकृत कंपनी म्हणून नोंद असलेल्या महाबीजकडून यंदाच्या खरीपात केवळ २० हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार आहे. यातूनच शासनाची मोफत बियाणे योजनाही राबविण्यात येणार आहे. यामुळे शासनाला खासगी बियाण्यांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे वास्तव आहे.
कृषी केंद्रांत सोयाबीन आणि तुरीचेच बियाणे
शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. यात शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या काळात कृषी केंद्रात बियाण्यांची गर्दी असते. यंदा मात्र तसे झाले नाही. आजच्या स्थितीत कृषी केंद्रांमध्ये खासगी कंपन्यांचे केवळ सोयाबीन आणि तुरीचे बियाणे उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे.
यातही सोयाबीनची केवळ ५,५०० क्ंिवटल आणि तुरीची २५० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. कृषी विभागाच्यावतीने सोयाबीनचा १ लाख १७ हजार हेक्टरवर पेरा नियोजित केला आहे. हा पेरा पूर्ण करण्याकरिता ५७ हजार ३८ क्ंिवटल सोयाबीनची आवश्यकता वर्तविण्यात आली आहे. तर तुरीची ३ हजार ७५३ क्विंटल बियाण्यांची गरज वर्तविण्यात आली आहे. इतर बियण्यांची अवस्थाही अशीच असल्याचे दिसून आले आहे.