विशेष रेल्वेगाडीने १,०१९ मजूर बिहार राज्याकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:21+5:30
वर्धेवरून सुटलेल्या या २४ डब्याच्या विशेष रेल्वे गाडीचा नागपूर, इटारसी, जबलपूर, डीडीव्ही या ठिकाणी काही मिनिटांसाठी थांबा राहणार आहे. त्यानंतर ही गाडी बिहार राज्यातील बरोनी गाठणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मजुरांना या गाडीत बसविण्यात आले होते. प्रत्येक मजूरांना पिण्याचे पाणी आणि जेवनाचा डबा वैद्यकीय जनजागृती मंच या सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बिहार राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या आणि लॉकडाऊनमुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या एकूण १ हजार १९ मजुरांच्या घरवापसीसाठी वर्धा जंगशन येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडी बुधवारी दुपारी ३ वाजता सोडण्यात आली.
वर्धेवरून सुटलेल्या या २४ डब्याच्या विशेष रेल्वे गाडीचा नागपूर, इटारसी, जबलपूर, डीडीव्ही या ठिकाणी काही मिनिटांसाठी थांबा राहणार आहे. त्यानंतर ही गाडी बिहार राज्यातील बरोनी गाठणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मजुरांना या गाडीत बसविण्यात आले होते. प्रत्येक मजूरांना पिण्याचे पाणी आणि जेवनाचा डबा वैद्यकीय जनजागृती मंच या सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. वर्धेवरून सुटणारीही विशेष रेल्वे गाडी गुरूवारी बरोनी येथे पोहोचणार आहे.
इंजिनसह बोगी आल्यात नागपूरवरून
लॉकडाऊनमुळे वर्धा आणि चंद्रपूर येथे अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी वर्धा रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आलेल्या रेल्वे गाडीचे इंजिन व २४ बोगी नागपूर येथून बुधवारी सकाळी वर्धेत दाखल झाले होते. तर दुपारी ३ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
विशेष रेल्वे गाडीत चालक म्हणून आर.पी. फुलमाळी तर गार्ड म्हणून एस. के. रॉय यांनी सेवा दिली. ही रेल्वे गाडी गुरूवारी रात्री ८.४० वाजता बरोनी येथे पोहोचणार असून विशेष प्रवासी रेल्वे गाडीने वर्धा जिल्ह्यातील ६७० तर चंद्रपूर जिल्ह्यातील ३४९ मजुरांचा त्यांच्या मुळ गावी रवाना झाले आहे.
व्हीजेएमने जोपासली सामाजिक बांधिलकी
वर्धा येथून बिहारकडे रवाना झालेल्या प्रत्येक मजुराला वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने नि:शुल्क जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बॉटल देण्यात आली. वैद्यकीय जनजागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी प्रत्येक मजूराला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून देत जेवनाचा डबा देत त्यांचा निरोप घेतला.
पालकमंत्र्यासह आमदारांना मास्क वापराचा विसर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने दक्षता म्हणून मास्कचा वापर करावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. शिवाय मास्कचा वापर न करणाºया व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु, मजुरांसाठी रवाना करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला हिरवीझेंडी देण्यासाठी आलेल्या पालकमंत्री सुनील केदार आणि आमदार रणजित कांबळे यांना जिल्हा प्रशासनाच्या या सूचनांचा विसरच पडल्याचे बघावयास मिळाले. इतकेच नव्हे तर काँग्रसेच्या एका माजी नगरसेवकानेही तोंडावर केवळ हातरुमाल धरून आमदारांशी चर्चा करीत रेल्वे स्थानकात प्रवेश मिळविला होता. त्यामुळे आता नियम मोडणाºया सदर व्हाईट कॉलर प्रतिष्ठीत व्यक्तींवर जिल्हा प्रशासन कुठली कारवाई करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी बजावले कर्तव्य
वर्धा रेल्वे स्थानकावर विशेष बसेसने आणण्यात आले. त्यानंतर या मजुरांना रेल्वेची तिकिट देत त्यांच्याकडून सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करून त्यांना रेल्वे स्थानकात नेण्यात आले.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन कुठल्याही परिस्थितीत व्हावेच तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वर्धा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे उड्डाण पुलापर्यंत वर्धा पोलीस विभागातील एक उपविभागीय पोलीस अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस कर्मचाºयांनी तर रेल्वे उड्डाण पुलानंतर रेल्वे सुरक्षा बलासह वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या एक कमांडन्ट, दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक तसेच ५० कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावले.
पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवीझेंडी
सदर विशेष श्रमिक ट्रेनला पालकमंत्री सुनील केदार यांनी हिरवीझेंडी दाखविली. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, शेखर शेंडे आदींची उपस्थिती होती.