दहावीचा हिंदी भाषेचा पेपर लिक ? सेलू येथील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 03:30 PM2024-03-09T15:30:32+5:302024-03-09T15:30:45+5:30
जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
चेतन बेले
वर्धा : दहावीच्या परीक्षा केंद्रावरून पेपर लीक झाला. तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना सेलू येथील यशवंत महाविद्यालयातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर आले आहे.
सध्या दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. हिदी भाषेचा शनिवारी पेपर सुरू झाला. दरम्यान, पेपर सुरू असतानाच पेपरची फोटो कॉपी व्हॉट्सअँप वर व्हायरल झाली. पेपर लीक झाल्याने एकच खळबळ माजली. शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. एवढेच नाही तर संवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथकही नियुक्त केले आहे. शिवाय पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना पेपर लिक झाल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हॉट्सअपवर आलेला पेपर नेमका कुठला हे निश्चित झाले नसल्याने त्याची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षण विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी असला काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
या प्रकरणाच्या माहिती मिळाली. प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक रवाना केले आहे. शिवाय उपशिक्षणाधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रावर पाठविले आहे. बैठे पथकाकडूनही माहिती घेणे सुरू आहे. चौकशीअंती प्रकार काय तो समोर येईल.
रोहन घुगे,
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा.