वर्धेत आजपासून १० वे सत्यशोधकी साहित्य संमेलन
By admin | Published: February 11, 2017 12:45 AM2017-02-11T00:45:17+5:302017-02-11T00:45:17+5:30
दहावे सत्यशोधकी साहित्य संमेलन ११ व १२ फेब्रुवारीला वर्धा येथील शिव वैभव सभागृह (व्यंकटराव गोडे साहित्य नगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे
व्यंकटराव गोडे साहित्य नगरी सज्ज
वर्धा : दहावे सत्यशोधकी साहित्य संमेलन ११ व १२ फेब्रुवारीला वर्धा येथील शिव वैभव सभागृह (व्यंकटराव गोडे साहित्य नगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व संशोधक डॉ. गेल आॅम्व्हेट, सातारा , तर स्वागताध्यक्षपदी डॉ. शिरीष गोडे राहतील.
या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ संपादक, विचारवंत व नाट्यलेखक ज्ञानेश्वर महाराव (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येईल, अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, मुख्य आयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी दिली. आयोजनाकरिता समितीचे अध्यक्ष गुणवंत डुकरे, उपाध्यक्ष कपिल थुटे, सचिव राजेंद्र कळसाईत, जनार्दन देवतळे, सुधीर गवळी परिश्रम घेत आहे.
संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष अॅड. वसंतराव फाळके, उत्तमराव पाटील, महिला प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चारूलता टोकस, सत्यशोधक साहित्य, संस्कृती परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीराम गुंदेकर, माजी संमेलनाध्यक्ष नागेश चौधरी, प्रा. नूतन माळवी उपस्थित राहतील.
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. गेल आॅम्व्हेट यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. प्रमुख पाहुणे म्हणून खा. रामदास तडस, अभ्युदय मेघे, विजय आगलावे, प्रा. जैमिनी कडू, दिलीप घावडे, किशोर माथनकर, आप्पासाहेब मैंद, अॅड. हिराचंद बोरकुटे उपस्थित राहतील. प्रा. माधव गुरनुले अहवाल वाचन करतील.
संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून राज्यभरातील नामवंत लेखक, विचारवंत व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी होणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)