११ अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस, आरोपींमध्ये सात अल्पवयीनांचा सहभाग
By चैतन्य जोशी | Published: March 17, 2024 07:13 PM2024-03-17T19:13:25+5:302024-03-17T19:14:06+5:30
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टी सेल पथकाने १६ रोजी केली.
वर्धा: वर्धा उपविभागातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी, शेती साहित्य चोरी करणाऱ्या अट्टल ११ जणांच्या टोळीचा पर्दाफाश करीत चार चोरट्यांना अटक केली. तर उर्वरित सात अल्पवयीन चोरांना ताब्यात घेत तब्बल १२ गुन्ह्यांची उकल करुन पाच लाख ४२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टी सेल पथकाने १६ रोजी केली.
शेख इम्रान शेख हमीद (२८ रा. तारफैल), फर्जंद बेग हबीब बेग (२० रा. तारफैल), रितेश गजानन जाधव (२१ रा. म्हाडा कॉलनी), विधान विजय निवल (२० रा. रामनगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून उर्वरित सात अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांनी दिली.
मागील काही दिवसांपासून वर्धा उपविभागात शेती साहित्य चोरी, घरफोडी, चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टी सेल पथकाला चोरट्यांचा सुगावा लागला. पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता वर्ध्यात चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचे समजले. पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवून ११ जणांच्या टोळीला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी चोरीची कबूली दिली. अटक केलेल्यांमध्ये सात जण अल्पवयीन असल्याचे समजल्याने त्यांना ताब्यात घेत उर्वरित चौघांना अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून लोखंडी रॉड, १५ सेंट्रींगच्या प्लेटा, इलेक्ट्रीक वायरचे तुकडे तसेच रामनगर हद्दीतून सेंट्रींगच्या ३६ प्लेटा, लोखंडी रिंग, इलेक्ट्रीक वायर, वर्धा शहर हद्दीतून सहा बॅटरी, सावंगी हद्दीतून २४ बॅटरी, सेवाग्राम हद्दीतून मोटर पंप, सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन गुन्ह्यातील ३ मोटारपंप, दहेगाव हद्दीतून मोटर तसेच सावंगी हद्दीतून इलेक्ट्रिक वायरचे सात बंडल चोरुन नेल्याची कबूली दिली. पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत करीत एकूण गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, दोन दुचाकी असा एकूण पाच लाख ४२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अमोल लगड, नरेंद्र पाराशर, नितीन इटकरे, अमरदीप पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.