जिल्ह्यातील ११० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:48 PM2018-09-14T23:48:04+5:302018-09-14T23:48:35+5:30

शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

110 people poisoned in the district | जिल्ह्यातील ११० जणांना विषबाधा

जिल्ह्यातील ११० जणांना विषबाधा

Next
ठळक मुद्देकीटकनाशक फवारणी करताना दक्ष राहणे गरजेचे

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यापैकी दोन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका व्यक्तीला शासकीय अनुदान देण्यात आले आहे.
पिकांवर येणारे विविध रोग आणि किटकांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची कृषी केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी उभ्या पिकांवर करतात. सदर किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्या अशा सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही देण्यात येत आहे. फवारणी करणाऱ्यांकडून फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय फवारणी करताना कुठल्याही खाद्यपदार्थ सेवन करणे हे धोक्याचे ठरते. परंतु, अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते. गत वर्षी किटकनाशकांची फवारणी करताना वर्धा जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांना आणि ६८ शेतमजुरांना अशा एकूण ७६ व्यक्तींना विषबाधा झाली होती. त्यापैकी वडनेर एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला जिल्हा प्रशासनाच्यावतीने ४ लाखांचे शासकीय अनुदान देण्यात आले आहे. तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांसह शेतमजुरांना किटकनाशके फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी अल्लीपूर येथील एका तरुण व अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सेवाग्राम येथील रुग्णालयात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
दोघांना गमवावे लागले प्राण
किटकनाशकांची फवारणी करताना योग्य दक्षता न घेणे हा प्रकार जीवावर बेतू शकतो. मागील वर्षी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे याचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाला होता. तर यंदाच्या वर्षी याच तालुक्यातील अल्लीपूर येथील विठ्ठल प्रभाकर भुसारी (३३) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सकाळी झाला. त्यामुळे किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.

किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला मळमळ होणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येत असल्यास त्या व्यक्तीने तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. विषबाधा झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास तो रुग्ण बरा होऊ शकतो.
- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: 110 people poisoned in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.