११,३८८ पर्यटकांना सौंदर्याची भुरळ

By admin | Published: May 29, 2015 01:57 AM2015-05-29T01:57:25+5:302015-05-29T01:57:25+5:30

बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांकरिता आकर्षणाचे केंद्र झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात अनेकांनी भेटी दिल्या.

11,388 Tourist Attractions | ११,३८८ पर्यटकांना सौंदर्याची भुरळ

११,३८८ पर्यटकांना सौंदर्याची भुरळ

Next

वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांकरिता आकर्षणाचे केंद्र झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात अनेकांनी भेटी दिल्या. यात मार्च अखेरपर्यंत ११ हजार ३८८ पर्यटकांची नोंद झाली आहे. यातून ८ लाख ६७ हजार १०० रुपयांचा महसुलही गोळा झाला आहे. वन विभागातर्फे पर्यटकांसाठी आॅनलाईन सुविधाही उपलब्ध असल्यामुळे येथे येणे सुलभ झाले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी पर्यटकांची गर्दी सातत्याने वाढत आहे.
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकीक प्राप्त झाला आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वन्यप्राण्यांचा असलेला अधिवास पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाची सफारी करताना येथील निसर्गसंपदा तसेच पट्टेदार वाघांसह बिबट, अस्वल, रानडुक्कर, नीलगाय, सांबर, चितळ, भेडकी, रानकुत्री, खवले मांजर आदी वन्यप्राण्यांचा मुक्त संचार पहावयास मिळतो. मध्य भारतासह देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आहेत.
वाघाच्या हमखास दर्शनासह विविध प्रकारचे वन्यप्राणी एकाच ठिकाणी पहायला मिळत असल्यामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे ठरत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्याय म्हणून बोर व्याघ्र प्रकल्प पुढे येत आहे. वर्धा नागपूर मार्गावर असलेल्या सेलू तालुक्यातील हिंगणी गावाजवळ दक्षिण सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये असलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी वनविभागातर्फे विशेष सुविधा उपलब्ध आहेत. बोर धरण प्रवेशद्वारावरच पर्यटकांसाठी पर्यटक माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 11,388 Tourist Attractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.