गांधी आश्रमाला ११४ क्विंटल धान्याचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:08 PM2019-04-24T22:08:31+5:302019-04-24T22:09:59+5:30
येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल हळदीचेही उत्पन्न मिळाले आहे.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल हळदीचेही उत्पन्न मिळाले आहे.
नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पिकविण्यात आलेला शेतमाल फायद्याचे ठरतो. ही बाब लक्षात घेऊन आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने उपलब्ध शेतजमिनीवर विविध पीक घेतली जातात. यात गहू, चणा, तूर या धान्य वर्गीय पिकांचा तर हळद या औषधी वर्गीय पिकाचा तसेच कापसाचा समावेश आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात आलेल्या धान्याची मागणीही नागरिकांकडून बऱ्यापैकी असते. १९३६ मध्ये आश्रमची स्थापना करण्यात आल्या नंतर शेती आणि गोशाळा सुरू करण्यात आली. त्यावेळपासून ते आजही येथे शेती पारंपरिक पद्धतीने केल्या जात. कार्यकर्त्यांची संख्या वाढली. शिवाय व्याप व कार्य वाढले, तशी शेतीची गरज वाढायला लागली. परिणामी, आवश्यकतेनुसार शेती घेण्यात आली. आश्रमची व्यवस्था शेती आणि गोशाळेवर अवलंबून असल्याने तसेच बलवंतसिंग सारखे कार्यकर्ते असल्याने पारंपरिक पिके व संबधित उत्पादने घेतल्या जात असे. आज पण आश्रमात पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते. शेतातील उत्पादने कार्यकर्ते, यात्री निवास, प्राक्रृतिक आहार केंद्र आणि ग्रामोद्योगच्या माध्यमातून पर्यटक, दर्शनार्थी यांना विक्री केली जाते.
आश्रम प्रतिष्ठानाकडे ८० एकर शेती
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाकडे ८० एकर शेती असली तरी आश्रम प्रतिष्ठान सध्या चाळीस एकर मधील शेतजमीन स्वत: कसते. तर उर्वरित ४० एकर शेती ठेक्याने देण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये तूर, गहूू, चणा, हळद आणि चारा आदी पिकांचे उत्पन्न घेण्यात आले आहे.
यंदा आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा तर ८ क्विंटल हळदीचे उत्पन्न झाले आहेत. शेती करताना सेंद्रिय पद्धतीचा वापर होतो. त्यामुळे येथील धान्यालाही नागरिकांकडून चांगली मागणी असते. विषमुक्त धान्य याबाबत नागरिकही जागरूक होत असल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात आलेल्या खाद्यांन्नाच्या मागणीत वाढ झाली आहे.
- नामदेव ढोले, शेती विभाग प्रमुख, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.
मजुरांना मिळतेय बाराही महिने काम
आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने शेती केल्या जात असल्याने स्थानिक मजुरांनाही याच शेतीच्या माध्यमातून काम मिळते. शेती आणि उत्पादने आश्रमाच्या उत्पन्नाचे स्रोत असून ते आश्रम प्रतिष्ठानाला आर्थिक हातभार लावण्यास मदतच करतात. वर्षभर शेतीची कामे चालत असल्यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळते.