११४ गोवारी बांधवाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
By admin | Published: January 23, 2017 12:45 AM2017-01-23T00:45:04+5:302017-01-23T00:45:04+5:30
काबाड कष्ट करून जीवन जगणारा गोवारी समाज मागील सात दशकांतही आपली प्रगती करू शकला नाही.
रामदास तडस : मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन
पुलगाव : काबाड कष्ट करून जीवन जगणारा गोवारी समाज मागील सात दशकांतही आपली प्रगती करू शकला नाही. आदिवासी समाजात समावेश असतानाही या समाजाला आरक्षणाचा किंवा शासकीय सवलतीचा लाभ पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही. १९८५ मध्ये गोवारी समाज हा श्रीमंत असल्याचा कांगावा करून लालफित शाहीतील काही अधिकाऱ्यांनी या समाजाला शासकीय योजनांच्या लाभापासून दूर ठेवले. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यासाठी या समाजाने संघर्षातून संघटना निर्माण केली. आपल्या न्याय मागण्यासाठी २३ नोव्हेंबर १९९४ साली नागपूर अधिवेशन सुरू असताना ११४ गोवारी बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या ११४ गोवारी बांधवाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. गोवारी समाजाच्या न्याय मागण्यांचा आपण शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन रामदास तडस यांनी आदिवासी गोवारी जमात समाज मेळाव्यात दिले.
स्थानिक गुरूनानक मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी गोवारी समाज संस्था नागपूरचे अध्यक्ष शालिक नेवारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मनोहर शाहारे (कळंब), नामदेव नेहारे (वर्धा), मलकापूरच्या सरपंच साधना नेहारे, भाजपाचे नितीन बडगे, प्रभाकर शहाकार, दामोदर नेहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मेळाव्यात आदिवासी गोवारी जमातीच्या सामाजिक, चालिरिती, संस्कृती या विषयावर गोंदिया येथील दामोदर नेवारे यांनी मार्गदर्शन केले. जमातीवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द शासकीय, संविधानिक व न्यायालयीन लढा या विषयावर रूपेश चामलाटे यांनी प्रकाश टाकला. डॉ. आनंद नेहारे यांनी स्वयंरोजगार व शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी राहुल खडतकर, चंदु साहारे, वासुदेव ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी खा. तडस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार ठाकरे यांनी केले. संचालन गजानन ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रतिक लसुंते, दिनेश कुसराम, मंगेश ठाकरे, मंगेश नेवारे, मंगेश चौधरी, रूपराव राऊत, गजानन ठाकरे, नरेंद्र बोरकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)