ओव्हरलोड वाहतुकीतून १.१५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:41 PM2018-03-01T23:41:47+5:302018-03-01T23:41:47+5:30
रस्त्यांची तथा वाहनांची भार वहन क्षमता ठरलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक केल्यास रस्ते तथा वाहने खराब होतात, हे सर्वश्रूत आहे.
प्रशांत हेलोंडे।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : रस्त्यांची तथा वाहनांची भार वहन क्षमता ठरलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक केल्यास रस्ते तथा वाहने खराब होतात, हे सर्वश्रूत आहे. भार वहन क्षमतेच्या आधारवरच पासिंगही केले जाते; पण बहुतांश वाहन धारक नफ्याच्या नादात क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करतात. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दहा महिन्यांत तब्बल १ हजार ७ वाहने तपासली. यात १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. यात जानेवारी महिन्यात ८२ वाहने तपासण्यात आलीत. यातील ३१ वाहने दोषी आढळून आली. पैकी २९ प्रकरणे निकाली काढत माल उतरवून ती वहने सोडून देण्यात आली. ८ वाहने आरटीओने जप्त केली आहेत. या एक महिन्याच्या कारवाईत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने स्थानिक तडजोड शुल्क ६ लाख ४६ हजार रुपये व विभागीय तडजोड शुल्क म्हणून २ लाख ७७ हजार रुपये असा ९ लाख २३ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेणारी ९२५ वाहने आरटीओकडून तपासण्यात आलीत. यात ४०७ वाहने दोषी आढळून आली. ३७३ प्रकरणे निकाली काढत त्यातील माल उतरवून वाहने सोडण्यात आली. यातील २६६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये स्थानिक तडजोड शुल्क म्हणून आरटीओने ७४ लाख २१ हजार रुपये तर विभागीय तडजोडीपोटी ३१ लाख ९८ हजार रुपये, असा १ कोटी ६ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दहा महिन्यांच्या कालावधीत तपासणी केलेल्या १ हजार ७ पैकी ४३८ वाहने दोषी आढळून आलीत. यातील ४०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून माल उतरवून वाहने सोडण्यात आली आहेत. एकूण २७४ वाहने जप्त केली. कारवाईमध्ये १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.
शहरातून अधिक भारवहन करणाऱ्या जड वाहनांना सूट आश्चर्यकारक
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग तथा जिल्हा मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक भार वहन करणाऱ्या जड वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. यातून १.१५ कोटींचा दंडही वसूल करण्यात आला; पण यातून शहरातील जड वाहने वगळली जात असल्याची चर्चा आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांत आहे. यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात. वास्तविक, कारवाईमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेला जात असेल तर त्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
ओव्हरलोड वाहतुकीबाबत सर्वत्र कारवाई केली जाते. यात बहुतांश वाहने अन्य जिल्हा वा राज्यातील असतात तशी वर्धा जिल्ह्यातीलही असतात. वर्धा शहरातील वाहने ओव्हरलोड वाहतूक करीत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाते.
- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.
रस्त्यांचीही होतेय चाळणी
क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केल्यामुळे वाहनांसह रस्त्यांचीही चाळणी होते. ग्रामीण, शहरी, जिल्हा तथा राज्य मार्गांची भार वहन क्षमता वेगवेगळी असते. ग्रामीण तथा शहरी रस्ते अधिक अवजड वाहतूक सोसू शकत नाही. जिल्हा मार्गही त्या तुलनेत कमकुवतच असतात. असे असले तरी सर्वच मार्गांवर सर्रास ओव्हरलोड वाहतूक केली जाते. यामुळे अनेक रस्त्यांची क्षमता नसल्याने चाळणी होत असल्याचे पाहावयास मिळते.