डाक घरातून १.१९ लाख लंपास
By admin | Published: February 3, 2017 01:52 AM2017-02-03T01:52:59+5:302017-02-03T01:52:59+5:30
येथील डाक व तार कार्यालयातील मुख्य प्रवेश द्वाराच्या कुलपासह कोंडा गॅस कटरने कापूस चोरट्यांनी तिजोरीतून १ लाख १९ हजार ३१८ रुपये लंपास केल्याची घटना
चोरीकरिता गॅस कटरचा वापर : चोरीत टोळीचा संशय
सेवाग्राम : येथील डाक व तार कार्यालयातील मुख्य प्रवेश द्वाराच्या कुलपासह कोंडा गॅस कटरने कापूस चोरट्यांनी तिजोरीतून १ लाख १९ हजार ३१८ रुपये लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. ही चोरी करणे कुण्या एका चोरट्याचे काम नसून याकरिता टोळीच कार्यरत असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता चोरट्यांनी एकाच वेळी दोन दरवाज्याचे कुलूप कटरने कापल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील डाक कार्यालयात चोरी झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता चोरट्यांनी प्रारंभी कार्यालयातील खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. यानंतर आतच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कार्यालयातील लोखंडी तिजोरी फोडली. या तिजोरीतून १ लाख १९ हजार ३१८ रूपये लांबविले. या प्रकरणी प्रभारी पोस्ट मास्टर अलका अनंत झिलटे यांच्या तक्रारीवरुन कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर चौकशी करीत आहे. ही चोरी करण्यात कुण्या एका चोरट्याचा नाही परिसरात एखादी टोळी कार्यरत असावी, असा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.(वार्ताहर)